Jobs : बँकेत नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार ! SBI मध्ये बंपर भरती; तब्बल 1500..

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 2026 च्या लिपिक (ज्युनिअर असोसिएट) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 1538 पदांसाठी ही भरती असून, अर्ज प्रक्रिया 7 ते 27 ऑगस्ट 2026 दरम्यान सुरू आहे. जाणून घ्या डिटेल्स..

Jobs : बँकेत नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार ! SBI मध्ये बंपर भरती; तब्बल 1500..
SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
| Updated on: Aug 10, 2026 | 11:05 AM

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पहात असला तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) क्लर्क अर्थात ज्युनिअर असोसिएट भरती 2026 चं नोटिफिकेशन जारी केलं आहे. या अभियानाअंतर्गतं 1500 हून अधिक पदांवर, तब्बल 1538 पदांसाठी भरती होणार असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच 7 ऑगस्ट 2026 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार हे 27 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. मात्र उमेदवार हे केवळ एकाच राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करू शकतात. तसेच, या जॉबसाठी अर्ज करायचा असेल तर, त्या संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेचं ज्ञान असणं देखील अनिवार्य आहे.

तीन टप्प्यांत होणार निवड

मिळालेल्या माहितीनुसार, SBI क्लर्क भरतीमध्ये उमेदवारांची निवड तीन टप्प्यांच्या आधारे केली जाणार आहे. सर्वात पहिले तर उमेदवारांची प्राथमिक परीक्षा (Prelims) घेतली जाईल. त्यानंतर जे उमेदवार प्रीलिम्समध्ये यशस्वी ठरतील, त्यांना मुख्य परीक्षेला (Mains) सामोरे जावे लागेल. आणि हा टप्पाही पार करून जे, अंतिम टप्प्यात पोहोचतील, त्यांची लोकल लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्ट (LLPT) घेतली जाईल. प्राथमिक परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता असून तर मुख्य परीक्षा ही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये पार पडू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

100 गुणांची प्रीलिम्स; चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग

यासाठीची प्राथमिक परीक्षा एकूण 100 गुणांची असेल. आणि या परीक्षेसाठी उमेदवारांना एक तासाचा वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव स्वरूपाचे असतील आणि ही परीक्षा तीन विभागांमध्ये घेतली जाईल. मात्र चुकीच्या उत्तरासाठी एक-चतुर्थांश गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल. SBI कडून प्रीलिम्स परीक्षेसाठी सेक्शन वाइज किंवा एकूण पात्रता गुणांची (Qualifying Cut-off) अशी कोणतीही, स्वतंत्र अट ठेवण्यात आलेली नाही.

मुख्य परीक्षेत मात्र, उमेदवारांना बँकेकडून जे निर्धारित करण्यात आलेले किमान गुण आहेत, तेवढं मिळवणं आवश्यक असेल. मात्र, कोणत्याही एका विभागात स्वतंत्रपणे किमान गुण मिळवण्याची अट यासाठी नसेल.

भाषेची परीक्षा कोणासाठी ?

या पदांसाठी जे अर्ज करतील त्या उमेदवारांपैकी कोणी जर दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित राज्याची स्थानिक भाषा शिकलेली असेल आणि तशी नोंद त्यांच्या मार्कशीटमध्ये असेल, तर त्या उमेदवाराला त्याला LLPT म्हणजेच स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणीतून सूट मिळेल. मात्र, जे उमेदवार, दहावी किंवा बारावीमध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकलेले नाहीत, त्यांना निवडीनंतर भाषा चाचणी द्यावी लागेल. या परीक्षेत उमेदवाराची स्थानिक भाषा वाचणं, लिहिणं, बोलणं आणि समजून घेण्याची क्षमता, या चारही बाबी तपासल्या जातील.

वयोमर्यादा किती?

SBI क्लर्क भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. मात्र, अर्ज भरताना उमेदवारांनी आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी सक्रिय ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. भरती प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाची माहिती उमेदवारांना मोबाईल नंबरवर किंवा मेलवरच पाठवली जाणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us