यंदाची सर्वात मोठी बँक भरती, 1865 रिक्त पदे, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
युनियन बँक ऑफ इंडियाने १८६५ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली असून पदवीधरांना दरमहा २०,००० रुपयांपर्यंत विद्यावेतन मिळवण्याची संधी आहे.

आपले करिअर बँकिंग क्षेत्रात सुरू करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने (UBI) १ हजार ८६५ अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवारांच्या) जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमुळे तरुणांना प्रत्यक्ष बँकिंग कामकाजाचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यामुळे भविष्यात ज्यांना बँकिंग करिअरसाठी मोठी संधी मिळणार आहे.
कुठे किती पद रिक्त?
देशभरातील विविध राज्यांमध्ये ही पदे विभागली गेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३३५ पदे, महाराष्ट्र १९६ पदे, तेलंगणा १६४ पदे, कर्नाटक १३१ पदे, मध्य प्रदेश ११६ पदे, तमिळनाडू ९५ पदे उपलब्ध आहेत. याशिवाय दिल्ली, गुजरात, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.
पात्रता आणि अटी काय?
शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. विशेष म्हणजे, उमेदवाराने आपली पदवी १ एप्रिल २०२२ नंतर पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
भाषेचे ज्ञान: उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे, त्या राज्याची स्थानिक भाषा त्याला अवगत असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया आणि परीक्षा
या भरतीसाठी उमेदवारांची निवड तीन मुख्य टप्प्यांवर आधारित असणार आहे. यासाठी उमेदवारांची बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येते का, याची तपासणी केली जाईल. शारीरिक पात्रतेसाठी वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.
आकर्षक विद्यावेतन
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या एक वर्षाच्या प्रशिक्षणादरम्यान पगारही दिला जाणार आहेत. यानुसार, ग्रामीण भागात १५ हजार, शहरी भाग १८ हजार आणि महानगरात २० हजार रुपये दरमहा दिले जाणार आहेत. यासाठी सामान्य/ओबीसी (पुरुष) ९४४, सर्व महिला उमेदवार ७०८ आणि SC/ST/दिव्यांगांसाठी २३६ रुपये फी भरावी लागेल.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी युनियन बँकेच्या unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Recruitment’ सेक्शनमध्ये अर्ज करावा. अर्जापूर्वी उमेदवारांनी NAPS किंवा NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.