Vasai Child Death : गॅलरीतून पडलेला मोबाईल वाकून बघायला गेली अन् होत्याचं नव्हतं झालं, वसईतील धक्कादायक घटना

| Updated on: Jul 29, 2022 | 6:03 PM

मयत मुलीची आई तिच्या मोठ्या मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेली होती. त्यामुळे मुलगी घरी एकटी झोपली होती. थोड्या वेळाने मुलीला जाग आल्यानंतर मुलगी गॅलरीत मोबाईल घेऊन खेळायला गेली अन् दुर्घटना घडली.

Vasai Child Death : गॅलरीतून पडलेला मोबाईल वाकून बघायला गेली अन् होत्याचं नव्हतं झालं, वसईतील धक्कादायक घटना
गॅलरीतून पडलेला मोबाईल वाकून बघायला गेली अन्...
Image Credit source: TV9
Follow us on

वसई : गॅलरीतून वाकून बघताना तोल गेल्याने सातव्या मजल्यावरुन पडून साडेतीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी वसईत घडली आहे. वसईच्या अग्रवाल टाउनशीप (Agrawal Township) या हाय प्रोफाईल सोसायटीतील रिजन्सी सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत माणिकपूर पोलीस (Manikpur Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रेया महाजन असे मयत झालेल्या साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचे नाव आहे. मयत मुलीची आई तिच्या मोठ्या मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेली होती. त्यामुळे मुलगी घरी एकटी झोपली होती. थोड्या वेळाने मुलीला जाग आल्यानंतर मुलगी गॅलरीत मोबाईल घेऊन खेळायला गेली अन् दुर्घटना घडली.

गॅलरीतून खाली वाकून बघताना तोल गेला

रिजन्सी सोसायटीतील सातव्या मजल्यावर महाजन कुटुंब राहते. मयत मुलीचे वडील कामानिमित्त सिंगापूरला असतात. त्यामुळे घरी आई आणि दोन मुलीच राहतात. आज सकाळी आई 7 वर्षाच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. यावेळी छोटी मुलगी श्रेया घरी एकटीच झोपली होती. अचानक मुलीला जाग आली. त्यानंतर मुलगी उठून गॅलरीत आली आणि मोबाईलवर खेळत होती. खेळताना मोबाईल हातातून सटकला आणि गॅलरीतून खाली पडला. मोबाईल बघण्यासाठी मुलगी गॅलरीतून वाकली. यावेळी तोल जाऊन मुलगी सातव्या मजल्यावरुन खाली पडली. मात्र सोसायटीच्या डकमधील एका एसीच्या हुकाला अडकून लटकली. यात तिच्या मणक्याचे हाड मोडले आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आई परत आली तेव्हा मुलगी मृतावस्थेत दिसली

मुलीची आई मोठ्या मुलीला शाळेत सोडून घरी आली तेव्हा सोसायटीच्या वॉचमनने तिला एक मुलगी गॅलरीतून पडली असल्याचे सांगितले. महिलेला तिकडे धाव घेत पाहिले असता ती तिचीच मुलगी होती. मुलीला अशा अकस्मात निधनाने आईला अश्रू अनावर झाले होते. गृहिणी महिलांनी आपल्या मुलांना एकटे घरात सोडताना पूर्ण काळजी घ्यावी अन्यथा शेजाऱ्यांना सांगून जावे, ज्यामुळे अशा घटना घडणार नाहीत असे आवाहन माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी केले आहे. (A one and a half year old girl died after falling from the seventh floor in a high profile society in Vasai)

हे सुद्धा वाचा