इमारतीच्या टेरेसवर सुसाईड रील्स बनवत होता, अचानक पाय घसरला अन् रील्स रिअलमध्ये बदलला गेला!

| Updated on: Mar 18, 2023 | 10:30 AM

तरुणांना सोशल मीडियाने प्रचंड वेड लावले आहे. इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पोस्ट करणे हे तर जणू तरुणांचा दैनंदिन कामांचा भाग बनला आहे. मात्र सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात नको ते करणे जीवघेणे ठरत आहे.

इमारतीच्या टेरेसवर सुसाईड रील्स बनवत होता, अचानक पाय घसरला अन् रील्स रिअलमध्ये बदलला गेला!
रील्स बनवण्याचा नाद जीवावर बेतला
Follow us on

बिलासपूर : सोशल मीडियामध्ये लाईक्स मिळवण्यासाठी आत्महत्येची रील्स बनवण्याचा प्रयत्न एका महाविद्यालयीन तरुणाच्या जीवावर बेतला. हा तरुण कॉलेजच्या बिल्डिंगच्या टेरेसवर उभा राहून इंस्टाग्रामसाठी सुसाईड रिल्स बनवत होता. संपूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे असताना दुर्दैवाने तरुणाचा टेरेसवरून पाय घसरला आणि तो खाली कोसळला. यात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. छत्तीसगडच्या बिलासपुरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रील्स बनवण्याच्या छंदाने तरुणाचा हकनाक बळी गेल्यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पोलिसांमध्ये नोंद झाली असून, तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आशुतोष गंधर्व असे तरुणाचे नाव असून तो विज्ञान शाखेत शिकत होता. बरेच तरुण छंद म्हणून तर काही तरुण कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने अशा प्रकारचे सोशल मीडिया व्हिडिओ पोस्ट करतात. आशुतोष हा आपल्या कुटुंबाला सावरण्याच्या हेतूने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होता. याच हेतूने त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन कॉलेजच्या बिल्डिंगच्या टेरेसवर आत्महत्येचा रील्स बनवण्याचा प्रयत्न केला होता.

डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

दुर्दैवाने या प्रयत्नात त्याला स्वतःलाच प्राण गमवावा लागला. टेरेसवरून खाली कोसळल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन आशुतोषचा जागीच मृत्यू झाला. आशुतोष खाली कोसळताच जोराचा आवाज आला. त्यामुळे आसपासच्या लोकांनी लगेच धाव घेतली. मात्र उंचावरून खाली कोसळलेल्या आशुतोषला वाचवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.

तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

आशुतोषला मृतावस्थेत पाहून आई-वडिलांना प्रचंड मोठा धक्का बसला. आशुतोषच्या आई-वडिलांनी जोरजोरात हंबरडा फोडला. रील्स बनवण्याच्या छंदाने कमी वयातच मुलाला प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे आशुतोषच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आशुतोषने मित्रांना सोबत घेऊन आत्महत्येचा रील्स बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या प्रयत्नामध्ये सहभागी झालेल्या मित्रांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. बिलासपूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.