बियर पार्टी तरुणीच्या जीवावर बेतली, नशेत सातव्या मजल्यावरून पाय घसरला अन्…

घरी आई येईल म्हणून एक तरुणी आपल्या दोन मित्रांसोबत पडीक इमारतीत दारु पार्टी करायला गेली. पण ही पार्टी तिची शेवटची ठरली.

बियर पार्टी तरुणीच्या जीवावर बेतली, नशेत सातव्या मजल्यावरून पाय घसरला अन्...
नवी मुंबईत सातव्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 09, 2023 | 12:22 PM

नवी मुंबई : मित्रासोबत बियर पार्टी करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. दारुच्या नशेत इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील NRI पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. बेलापूरमधील सेक्टर 15 मधील एका पडीक इमारतीत ही घटना घडली. तरुणीच्या अशा अपघाती मृत्यूमुले तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दरम्यान, पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

तरुणी पडीक इमारतीत मित्रांसोबत पार्टी करत होती

मयत 19 वर्षीय तरुणी आपल्या मित्राच्या घरी मागील दोन दिवसापासून राहत होती. काल सकाळी मित्राने त्याच्या मित्राला घरी बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला. घरीच बियर आणल्या, मात्र तरुणी आणि तरुणीच्या मित्राने घरी नको म्हणून बाहेर जाऊन पिण्याचे सांगितले. घरी आई येईल म्हणून बेलापूरमधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन पार्टी रंगली. यादरम्यान तरुणीचा मित्र लघुसशंकेला उठून बाजूला गेला असता, तरुणीही त्याच्या मागून गेली. यावेळी पाय घसरून सातव्या मजल्यावरुन ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

दोन्ही मित्रांची पोलीस चौकशी सुरु

प्राथमिक माहितीप्रमाणे मयत तरुणीने अर्धी बियर प्यायली होती. त्यामुळे तिचा पाय घसरून पडली असावा. मात्र पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून, दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. खरंच पाय घसरून पडली की अन्य काही याचा शोध पोलीस घेत आहेत. चौकशीअंतीच खरं काय ते उघड होईल.