
मुंबईत 2006 साली लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात हायकोर्टाने सर्व 12 दोषींची शिक्षा रद्द केली आहे. त्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला सवाल केला आहे. “या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र ATS च्या अधिकाऱ्यांविरोधात सरकार कारवाई करणार का? ज्यांच्यामुळे निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवण्यात आलं. आयुष्यातून आता चांगली वर्ष निघून गेल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका केली जाते” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. 2006 सालच्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सत्र न्यायालयाने सर्व 12 आरोपींना दोषी ठरवलं होतं. यात पाच जणांना फाशीची आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सोमवारी हायकोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली. शिक्षा झालेल्या 12 आरोपींपैकी एका आरोपीचा 2022 साली कोविडमुळे तुरुंगातच मृत्यू झाला होता.
ओवैसींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना लिहिलं की, “निर्दोष लोकांना तुरुंगात पाठवलं जातं. अनेक वर्षानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होते, तेव्हा आयुष्य पुन्हा बनण्याची कुठलीही शक्यता नसते. मागच्या 17 वर्षांपासून हे आरोपी तुरुंगात आहेत. एकादिवसासाठी सुद्धा ते तुरुंगाबाहेर आले नाहीत. त्यांच्या आयुष्यातली चांगली वर्ष निघून गेली आहेत”
‘खूपदा निराश केलय’
“ज्या प्रकरणात जनाक्रोश असतो, पोलिसांची नेहमीच त्या बाबतीत अशीच भूमिका असते. आधी ते दोषी मानतात. नंतर ते मागे हटतात. अशा प्रकरणात पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेतात. तपास यंत्रणांनी अशा दहशतवादाच्या प्रकरणात खूपदा निराश केलय” असं ओवैसी म्हणाले.
‘बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक’
“दोषी ठरवण्यात आलेल्या 12 जणांपैकी अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं. फैसल आणि मुजम्मिल या दोन सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ही बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांचा मृत्यू झाला. 2023 साली त्यांच्या आईचा सुद्धा मृत्यू झाला. मोहम्मद माजिदच्या पत्नीचं पतीशी शेवटचं संभाषण होऊ शकलं नाही” असं AIMIM प्रमुखांनी सांगितलं.
Innocent people are sent to jail and then years later when they are released from jail there is no possibility for reconstruction of their lives. From last 17 years these accused are in jail. They haven’t stepped out even for a day. The majority of their prime life is gone. In… https://t.co/nknsG344jk
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 21, 2025
स्पेशल कोर्टाचा निकाल
2006 साली मुंबई लोकल ट्रेनमध्ये 7 बॉम्बस्फोट झाले. यात 189 लोकांचा मृत्यू झाला. 824 जखमी झाले. या प्रकरणात सुनावणी दरम्यान 2015 साली स्पेशल कोर्टाने 12 आरोपींना दोषी ठरवलं. यात पाच जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप सुनावली. आता हायकोर्टाने आपल्या निर्णयात सर्व दोषींना दोषमुक्त ठरवून सुटका केली आहे.