Akola Crime : घाबराघुबरा चेहरा, डोळ्यांत पाणी, पोलिसांसमोर येऊन दिली गर्लफ्रेंडबाबतची अशी बातमी की…, पण ऑटोप्सीने फिरला खेळ

Live in Partner killed Crime : अकोला येथील लिव्ह-इन रिलेशनशिपमधील तरुणीच्या आत्महत्येची घटना सुरुवातीला आत्महत्या वाटली. परंतु, शवविच्छेदन अहवालाने धक्कादायक खुलासा केला: तिचा गळा आवळून खून झाला होता.

Akola Crime : घाबराघुबरा चेहरा, डोळ्यांत पाणी, पोलिसांसमोर येऊन दिली गर्लफ्रेंडबाबतची अशी बातमी की..., पण ऑटोप्सीने फिरला खेळ
क्राईम न्यूज
Image Credit source: social media
| Updated on: Dec 11, 2025 | 1:45 PM

एका तरूणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षांच्या तरूणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि अख्खं अकोला हादरलंचं. 7 डिसेंबरच्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये एक तरूण घाबराघुबरा होऊन आला, त्याला पाहून पोलिसही हबकले. माझ्या प्रेयसीने घरातच आत्महत्या करत जीवन संपवलं, असं सांगत तो रडू लागला. पोलिसांनी तातडीने महेश कॉलनीतील घरी धाव घेऊन त्या तरूणीचा मृतदेह ताब्यात घेतला, पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तरूणीच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्यास सुरूवातही केली, मात्र काही काळाने आलेल्या ऑटोप्सी रिपोर्टने सगळेच हादरले.

तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली नसून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले. ते वाचून पोलिसांनाही धक्का बसला. आत्महत्येच्या या केसला अचानक वेगळं वळण लागलं आणि पोलिसांनी त्या तरूणीचा प्रियकर पवन लक्ष्मण इंगळे याला ताब्यात घेतली. पोलिसी खाक्या दाखवत नीट चौकशी केल्यावर तो घडाघडा बोलू लागला आणि त्याने क्षणात आपला गुन्हा कबूल केला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

प्रियकराने केला लिव्ह-इन पार्टनरचा खून

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषद घेऊन 7 डिसेंबर रोजी शहरात घडलेल्या या हत्येची माहिती दिली. 7 डिसेंबरच्या रात्री पवन इंगळे हा शहर पोलीस ठाण्यात आला आणि आपल्या लिव्ह-इन पार्टनरने घरातच गळफास लावून जीव दिला, असं आम्हाला सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी महेश कॉलनीतलं त्याचं घर गाठलं, त्या तरूणीने गळफास घेऊन जीव दिल्याची माहिती समोर आल्याने सर्वांना ही सुसाईडची केस वाटत होती. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

त्यानतंर त्या तरूणीचा मृतदेह ऑटोप्सीसाठी कामी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता, पण त्याच ऑटोप्सी रिपोर्टमुळे सगळा खेळ पलटला. घटनास्थळी असलेली परिस्थिती, काही पुरावे आणि ऑटोप्सी रिपोर्टमुळे पोलिसांना संशय आला. त्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की त्या तरूणीचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे नव्हे तर गळा आवळल्यामुळे झाला आहे. त्याने पोलिसांना अधिकच संशय आला.

पोलिसांनी तिचा प्रियकर पवन इंगळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याने असं का केलं,हत्येमागचं कारण काय हे अद्याप समोर आलं नसून पोलिस या सर्व गोष्टींचा बारकाईने तपास करत आहेत. मृत तरूणीच्या भावाने तक्रार नोंदवली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत. आरोपी पवन याला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

Follow Us