पायऱ्यांवर बसून गप्पा, नंतर थेट पोटात चाकू खुपसला; अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं?

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.

पायऱ्यांवर बसून गप्पा, नंतर थेट पोटात चाकू खुपसला; अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलं?
thane crime
| Updated on: Feb 03, 2025 | 5:35 PM

Ambernath Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात खून, हत्या, दरोडे, महिला आणि बाल अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबरनाथमध्ये भर दिवसाढवळ्या एका महिलेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सध्या अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथमधील हुतात्मा चौकाकडून स्टेशन परिसरात जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली. एक महिला आणि पुरुष असे दोघेजण साईबाबा मंदिराच्या शेजारच्या पायऱ्यांजवळ बोलत बसले होते. ते बराच वेळ त्या मंदिराच्या शेजारच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यावेळी अचानक त्यांच्यात वाद झाला. यानंतर त्या पुरुषाला राग अनावर झाला. त्याने महिलेच्या पोटात दोन वेळा चाकू भोसकला. यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी ती महिला आणि पुरुष बोलत होते. अचानक त्यांचा वाद झाला आणि त्या पुरुषाने चाकू काढून तिच्या पोटात खुपसला. यानंतर एका ज्येष्ठ महिलेने त्या पुरुषाला चाकू का खुपसतो अशी विचारणा केली. त्यावर त्याने तू जास्त बोलू नकोस, नाहीतर तुलाही मारुन टाकेन, अशी धमकी त्या महिलेला दिली. त्या घाबरलेल्या महिलेने तिच्या मुलाला बोलवले. मात्र तोपर्यंत तो हल्लेखोर पळून गेला होता. यानंतर त्याने त्या महिलेला रिक्षात बसवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.

या हल्ल्यानंतर त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत हल्लेखोर इसमाला ताब्यात घेतलं. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.

कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान यामुळे राज्यातील कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असताना यावर कडक कायद्याची अंमलबजावणी कधी केली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.