डब्यात चढताना धक्का लागला, धावत्या लोकलमध्ये वृद्धाला संपवले !

| Updated on: Mar 03, 2023 | 9:44 AM

कल्याण स्थानकातून टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना धक्का लागल्याच्या रागातून एका वृद्धाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

डब्यात चढताना धक्का लागला, धावत्या लोकलमध्ये वृद्धाला संपवले !
क्षुल्लक वादातून टिटवाळा लोकलमध्ये वृद्धाला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण / सुनील जाधव : लोकलमध्ये चढताना झालेल्या क्षुल्लक वादातून धावत्या लोकलमध्ये एका वृद्धाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. बबन हांडे देशमुख असे हत्या करण्यात आलेल्या 65 वर्षीय इसमाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. कल्याण ते टिटवाळा लोकलमध्ये काल दुपारी ही घटना घडली.

कल्याण स्थानकातून टिटवाळ्याकडे जाणारी पकडली

बबन हांडे देशमुख हे सेवा निवृत्त होते. ते आंबिवली येथे राहत होते. गुरुवारी दुपारी हांडे हे आंबिवली स्थानकातून लोकल गाडी पकडून कल्याणला काही कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते पुन्हा आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातून दुपारच्या सुमारास टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी गाडी पकडली.

गाडीत चढताना एका प्रवाशाला धक्का लागल्यावरुन वाद

हांडे हे गाडीच्या लगेज बोगीत चढत असताना त्या ठिकाणी गाडीत चढताना धक्का लागल्यावरुन एका प्रवाशासोबत वाद झाला होता. या वादा दरम्यान त्यांना त्या प्रवाशाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबन हांडे देशमुख यांचा धावत्या ट्रेनमध्येच मृत्यू झाला. ट्रेनमध्ये मारहाणीची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 65 वर्षीय वयोवृद्ध बबन यांना शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

सध्या लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी एक संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. लोकलमध्ये नेमके काय घडलं होतं याचा तपास पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे बबन हांडे देशमुख यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला की आणखी काही कारण होते, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. हांडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठवला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सत्य उघड होईल.