
पांढरा स्वच्छ कुर्ता आणि पांढरी टोपी, असा वेष असलेला मुंबईचा डॉन, दाऊदशी वाकडं घेणारा गँगस्टर अशी ओळख असलेला अरूण गवळी बऱ्याच वर्षांनी तुरूंगातून बाहेर आलेला आहे. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जेलची हवा खावी लागणाऱ्या अरूण गवळीला तब्बल 17 वर्षांनी जामीन मिळाला असून नुकताच तो त्याच्या प्रसिद्ध दगडी चाळीत परतला. 90 च्या दशकात अरुण गवळीहा ‘सुपारी किंग’ आणि ‘डॅडी’ म्हणून प्रसिद्ध झाला. नंतर, मुंबईतील या गुंडाने राजकारणातही हात आजमावला. 1990 च्या दशकात, जेव्हा मुंबईत टोळीयुद्ध शिगेला पोहोचले होते, तेव्हा सर्व गुंड देश सोडून पळून जात होते, तेव्हा अरुण गवळी हा एकमेव असा होता जो मुंबई सोडून गेला नाही.
अहमदनगरमध्ये जन्मलेला अरूण गवळी 80च्या दशकात गुन्हेगारी साम्राज्यात आला आणि हळूहळू त्याचं नाव सगळीकडे ऐकू येऊ लागलं. सुरुवातीला अरुण गवळी मुंबईतील एका कापड गिरणीत काम करायचा. 1970 ते 1980 च्या अखेरीस, मुंबईतील कापड उद्योगात झालेल्या अनेक संपांमुळे अनेक गिरण्या बंद पडल्या.अनेक तरूण बेरोजगार झाले, ज्यामध्ये गवळीचाही समावेश होता. त्यानंतर तो रामा नाईक आणि बाबू रेशिम यांच्या “भायखळा कंपनी” मध्ये सामील झाला, जी मध्य मुंबईतील भायखळा, परळ आणि सात रास्ता भागात गुन्हेगारी रॅकेट चालवत होती. 1984 ते 1988 भायखळा कंपनीने दाऊदच्या डी-कंपनीला अनेक प्रकरणांमध्ये मदत केली. 1988 मध्ये पोलिस चकमकीत रामा नाईक मारला गेल्यानंतर, अरुण गवळीने टोळीची सूत्रे हाती घेतली आणि त्याच्या घरातून, दगडी चाळ येथून गुन्हेगारीचा व्यवसाय चालवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे गुन्हेदारी साम्राज्यात बस्तान बसू लागले.
डॅडी नाव कसं मिळालं ?
अरूण – गवळीचे पुणे शहराशी जुनं नातं आहे. याच शहरामुळे गवळीला लोक ‘डॉन’ म्हणून ओळखत होते. 1990 साली टाडा न्यायालयाने गवळीला शिक्षा सुनावल्यानंतर, त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. त्या वेळी तुरुंगात तैनात असलेल्या पोलिसांच्या सांगण्यानुसार, गवळी हा एक क्रूर गुन्हेगार होता आणि तो येरवडा तुरुंगातून खंडणी आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगसारखी कामे करत असे. – कैदी त्याला ‘डॉन’ म्हणत असत आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो ‘डॅडी’ म्हणून प्रसिद्ध झाला. पुण्यातील व्यापारी त्याच्या भीतीने थरथर कापायचे. तो 2004 सालापर्यंत पुण्याच्या येरवडा तुरुंगात राहिला.
रमा नाईक मारला गेला अन्… दाऊदसोबतची दोस्ती दुश्मनीत कशी बदलली? वाचा अरुण गवळीची इन्साईड स्टोरी
गुन्हेगारी साम्राज्य ते नेता.. राजकारणात एंट्री कशी ?
1993 च्या शिवसेना नेत्याच्या खून प्रकरणासह इतर प्रकरणांमध्ये कायद्याची कडक पकड पाहून, गवळीने नवीन शतकाच्या सुरुवातीला राजकारणातही हात आजमावला. 2004 मध्ये त्याने अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. चिंचपोकळी येथून निवडणूक लढवून तो विजयी झाला. पण जेव्हा गवळीचे पुतणे आणि आमदार सचिन अहिर यांनी त्याचा पक्ष सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा गवळीच्या राजकीय कारकिर्दीत अडचणी आल्या. नंतर लोकसभा निवडणुकीत सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर गवळींविरुद्ध उभे राहिले. दोघांनाही पराभव पत्करावा लागला आणि शिवसेनेचे मोहन रावले यांनी जागा जिंकली. गवळीची मुलगी गीता बीएमसी निवडणुकीत नगरसेवक झाली.
आमदार झाल्यानंतर 2008 मध्ये गवळीने शिवसेनेच्या एका नगरसेवकाची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने गवळीला दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गवळीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा मुंबईतील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 17 वर्षांपासून तो तुरूंगात आहे, नुकतीच ( 5 सप्टेंबर) त्याची जामिनावर सुटका झाली.
आयुष्यावर बनले चित्रपट
डॉन अरुण गवळीच्या आयुष्यावर अनेक बॉलिवूड चित्रपट बनले आहेत. 2015 मध्ये आलेल्या ‘दगडी चाळ’ या मराठी चित्रपटात मकरंद देशपांडे, याने गवळीचे अर्थात ‘डॅडी’ पात्र साकारले. तर 2017 साली आलेल्या ‘डॅडी’ चित्रपटात अर्जुन रामपाल ह अरूण गवळीच्या भूमिकेत दिसला होता.