हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी थांबले होते, इतक्यात सहा जण आले अन्…, कारण काय?

मित्राच्या अस्थीविसर्जनासाठी मुंबईहून पुण्यात गेलेल्या इसमावर अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्याचे कारण निष्पन्न होताच हैराण व्हाल.

हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी थांबले होते, इतक्यात सहा जण आले अन्..., कारण काय?
पुण्यात किरकोळ कारणातून व्यक्तीवर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 27, 2023 | 2:54 PM

पिंपरी चिंचवड : हॉटेलमध्ये पार्सल आणण्यासाठी गेलेल्या इसमावर अज्ञात सहा जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना वाकड परिसरात घडली. किरकोळ कारणावरून हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकड पोलिसांनी वेगाने तपास करत सहा जणांना अटक केली आहे. सुनील कुसे असे हल्ला झालेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेले सर्व आरोपी मूळचे तामिळनाडूतील रहिवासी असून, सध्या काळेवाडी परिसरात राहत आहेत. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींना तामिळनाडूमधून अटक केली. आरोपींविरोधात भादंवि कलम 307, 504, 141, 143, 144, 147, 148, 149, आर्म अॅक्ट 4, 25 सह 135, क्रिमिनल अमेंटमेंट अॅक्ट 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फिर्यादी आणि आरोपी एकमेकांसाठी अनोळखी आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित सुनील कुसे हे मूळचे मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी आहेत. मित्राच्या अस्थीविसर्जनासाठी ते पुण्यात आले होते. अस्थीविसर्जन झाल्यानंतर ते काळेवाडी येथे आपल्या बहिणीकडे रहायला गेले. यावेळी कामानिमित्त ते आपले भावोजी ज्ञानेश्वर बोरकर आणि भावोजींचे मित्र मोहन चेंदे, बिट्टू ऊर्फ संघर्ष चंदनशिवे यांच्यासोबत फिरत होते. यातील संघर्ष चंदनशिवे याच्या वडिलांना परिसरातील दक्षिण भारतीय तरुणाने धक्काबुक्की केली होती. याबाबत चंदनशिवे याने तरुणाला जाब विचारला होता. याचा राग सदर तरुणाच्या मनात होता.

सदर दक्षिण भारतीय तरुण आणि त्याचे साथीदार चंदनशिवेचा शोध घेत होते. यावेळी फिर्यादी सुनील कुसे हे एका हॉटेलबाहेर उभे असल्याचे आरोपींना दिसले. आरोपींनी कुसे यांना चंदनशिवे याच्यासोबत पाहिले होते. त्यामुळे त्यांनी चंदनशिवे भेटला नाही म्हणून कुसेवर जीवघेणा हल्ला केला. यात कुसे जखमी झाले. त्यांना तात्काळ पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फिर्यादीच्या जबाबावरुन पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. अरुमुगम सुब्बयाह, शंकर अरुणाचलम, रमेश अरुणाचलम, वानमामलाई मुथ्थया, इसकीपांडी सुब्बलह, मायाकन्नन सुब्रमणी अशी अटक आरोपींची नावे आहेत.