केबिनमध्ये बोलावून… बीड विनयभंग प्रकरणातल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर!

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे प्रकरण सध्या फारच चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपीवर आता आणखी मोठा आरोप करण्यात आला आहे.

केबिनमध्ये बोलावून... बीड विनयभंग प्रकरणातल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर!
beed crime news
| Updated on: Jul 02, 2025 | 5:13 PM

 Beed Molestation Case : बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इथे एका खासगी कोचिंग क्लासध्ये प्राध्यापकांनीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं आहे. विशेष म्हणजे या घटनेवर विधिमंडळातही चर्चा झाली. दरम्यान, आता याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. विनयभंग प्रकरणातील आरोपी विजय पवार याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या मुलीचा त्याने छळ केला होता, अशी तक्रार संबंधित पीडित मुलीने केली आहे.

आणखी एका मुलीने समोर येत काय आरोप केले?

विजय पवार हा माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप कथित पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे असा आरोप या पालकांनी केला आहे. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे.

नेमके प्रकरण काय?

बीडच्या नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील एका खासगी क्लासेसमध्ये जुलै 2024 ते 25 मे 2025 पर्यंत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची तक्रार पीडीतेने शिवाजीनगर पोलिसात 26 जून 2025 रोजी दिली होती. त्याच दिवशी यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे फरार झाले होते. 28 जून रोजी लिंबागणेश परिसरातून विजय पवार याला, तर चौसाळा बायपासवरून आरोपी प्रशांत खाटोकर याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते.

त्यानंतर 29 जून रोजी या दोघांनाही बीड जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

धनंजय मुंडे यांनी केले गंभीर आरोप

यानंतर त्याच दिवशी सायंकाळी आमदार धनंजय मुंडे यांनी पीडीत कुटुंबाची भेट घेतली होती. रात्री 8.30 वाजता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर हे गुन्हा दाखल झाला त्या दिवशी रात्री 11 वाजता आरोपी सोबत होते, आरोपींना त्यांचे पाठबळ आहे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. तर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे नेमके काय संबंध आहेत हे समोर येणं गरजेचं आहे त्यासाठी तपास व्हावा अशीही मागणी त्यांनी केली.

बीडच्या प्रकरणाची होणार एसआयटी चौकशी

आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमके काय समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.