परळीत माणुसकीला काळिमा, 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, शहर बंद, हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर

परळी वैजनाथ येथे पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. आरोपीला अटक झाली असून, शहरात बंद पाळला जात आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोरदार केली जात आहे.

परळीत माणुसकीला काळिमा, 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, शहर बंद, हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर
| Updated on: Sep 03, 2025 | 11:32 AM

बीडमधील परळी वैजनाथ येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या रेल्वे स्थानकात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, विशेषतः फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

पंढरपूर येथील एक जोडपे कामाच्या शोधात आपल्या पाच वर्षांच्या मुलीसोबत परळीत आले होते. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर मुलीची आई आजारी असल्याने ती मुलीला घेऊन रेल्वे स्थानकातच झोपली होती. वडील जवळच दुसरीकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने मुलीला उचलून नेले. तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ही मुलगी रडत आपल्या आईकडे आली. त्यानंतर तिच्या आईने तिच्या गुप्तांगातून होणारा रक्तस्राव पाहिला आणि त्यानंतर तिला हा अमानुष प्रकार समोर आला.

या घटनेनंतर चिमुकलीला तातडीने परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी आज सखल परळीकरांच्या वतीने परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

परळी शहरात प्रचंड संतापाचे वातावरण

या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सर्व परळीकर एकत्र आले आहेत. या मागणीसाठी आज सकाळी दहा वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून उपविभागीय कार्यालयावर एक मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राजकीय, सामाजिक, व्यापारी, डॉक्टर आणि मुस्लिम बांधवांसह सर्वच स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या घटनेमुळे परळी शहरात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे. सध्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

परळीत झालेल्या घटनेनंतर आता या ठिकाणी मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मूक मोर्चात महिला आणि पुरुष हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीचे संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं. तसंच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला आहे  या मूक मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या परळीकर डॉक्टर व्यापारी राजकीय नेते सकाळपासून बंद ठेवून मूक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.