खूप कठीण होतं, जड अंतकरणाने त्यांनी पोटच्याच मुलांचा गळा चिरला, मन हेलावून टाकणारी घटना

| Updated on: Aug 28, 2021 | 7:33 PM

मध्यप्रदेशच्या भोपाळ शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लॉकडाऊन काळात हातातील कामधंदा सुटला म्हणून नैराश्यात गेलेल्या एका दाम्पत्याने हतबलतेत आपल्या पोटच्याच मुलांचा गळा चिरला.

खूप कठीण होतं, जड अंतकरणाने त्यांनी पोटच्याच मुलांचा गळा चिरला, मन हेलावून टाकणारी घटना
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

भोपाळ : काही घटना आपल्याला सुन्न करुन जातात. त्या घटनांवर आपण नि:शब्द होतो. नेमकी प्रतिक्रिया काय द्यावी, हेही कळत नाही. मध्यप्रदेशच्या भोपाळ शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लॉकडाऊन काळात हातातील कामधंदा सुटला म्हणून नैराश्यात गेलेल्या एका दाम्पत्याने हतबलतेत आपल्या पोटच्याच मुलांचा गळा चिरला. त्यानंतर दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

आई-वडील आपल्या मुलांचं संगोपण करतात. त्यांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटतात. पण भोपाळमध्ये एका दाम्पत्यावर प्रचंड मोठी नामुष्की ओढावली आहे. हातात कामधंदा-पैसे नाहीत म्हणून ते नैराश्यात गेले. त्यातूनच त्यांनी आपल्या मुला-मुलीला संपवून स्वत: आत्महत्या करण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे अशा प्रकारचं कृत्य करणारा कुटुंबप्रमुख हा पेशाने सिवील इंजिनिअर आहे. पण लॉकडाऊन काळात त्याच्या हातातील काम गेलं. दुसरीकडे त्याची पत्नी ब्यूटी प्रोडक्ट्स विकण्याचं काम करायची. पण लॉकडाऊन काळात त्यांचं आर्थिक गणित बिघडलं. आर्थिक अडचणींमुळे या दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचललं.

संबंधित घटनेची माहिती समोर कशी आली?

संबंधित घटना ही भोपाळच्या मिसरोद पोलीस ठाणे हद्दीत घडली. शहरातील 102 मल्टी सहारा परिसरात वास्तव्यास असलेले ठाकरे कुटुंब शनिवारी सकाळी उजेड पडल्यानंतरही बराच वेळ घराबाहेर पडलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या शेजारच्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा ठाकरे कुटुंबाचा घराचा दरवाजा आतून लॉक असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी तो दरवाजा तोडला. त्यानंतर या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख असलेले रवी ठाकरे यांच्या तोडातून फेस पडताना दिसला. त्यांच्या पत्नी रंजना ठाकरेही बेशुद्ध होत्या. तर मुलगा चिराग आणि मुलगी गुंजन रक्तबंबाळ अवस्थेत दिसले.

महिला आणि मुलीवर उपचार सुरु

पोलिसांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत बराच उशिर झाला होता. रवी ठाकरे आणि त्यांचा मुलगा चिराग यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर पत्नी रंजना ठाकरे आणि मुलगी गुंजना यांची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला असता तिने पोलिसांकडे आपली व्यथा मांडली. या दाम्पत्याने टाईल्स कटर मशीनने मुलाचा गळा कापला. त्यानंतर मुलीचाही गळा कापण्याचा प्रयत्न केला. यावेळी मशीन बंद पडलं. त्यामुळे मुलीचा जीव वाचला, अशी माहिती समोर आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

प्रेम एकीवर केलं, लग्न दुसरीसोबतच, पहिलीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं, आता जगण्यासाठी संघर्ष

मुलगी झाल्यानं छळ, रात्रभर टीव्ही सुरु राहिल्याचं निमित्त, पतीनं थेट पत्नीचा गळा घोटला, पुण्यातील धक्कादायक घटना