
पाटणा : पत्नीचा हात निकामी झाल्यामुळे शार्प शुटरच्या माध्यमातून पतीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर येथे घडली. 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी या हत्येचा छडा अवघ्या 36 तासांत लावलाय. आपल्याच पत्नीला संपवण्यासाठी रचलेला कट अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी महिलेचा पती रवी कुमार, रवी कुमारचे दोन भाऊ तसेच दोन शार्प शूटर यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील मुंगेर येथील दीपिका शर्मा या महिलेची हत्या करण्यात आली. ही महिला सोमवारी टॉयलेटला जात होती. यावेळी अचानकपणे तिच्यावर काही शार्प शूटरने गोळ्या झाडल्या. काही समजायच्या आत हल्ला केल्यामुळे दीपिका शर्मा रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या हल्ल्यात शर्मा यांचा मृत्यू झाला होता.
दापिका शर्मा या महिलेची हत्या करण्याचा कट खुद्द तिच्याच पतीने रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मुंगेरचे एसपी जगुनाथरेड्डी जलारेड्डी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार दीपिका शर्मा यांच्या माहेरी 2017 साली गोळीबार झाला होता. यावेळी शर्मा सात महिन्याच्या गर्भवती होत्या. गोळीबारात दीपिका यांच्या आईचा मृत्यू झाला होता. तर दीपिका यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. याच गोळीबारात त्यांचा एक हात निकामी झाला होता. पत्नीचा हात काम करत नसल्यामुळे आरोपी पती रवी कुमार वैतागला होता. तसेच पतीसह मृत महिलेच्या सासरची मंडळीदेखील नाराज होते. याचा नाराजीतून दीपिका यांची नंतर हत्या करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या गौतम कुमार या शूटरने हत्येचा कट नेमका कसा शिजला याबाबत माहिती दिलीय. गौतम कुमार याने सांगितल्यानुसार, जवळपास एका महिन्याआधी सुमित कुमारने त्याला फोन केला होता. माझा भाऊ रवी कुमार हा सीआयएसएफ धनाबाद येथे कार्यत आहे. त्याला आपल्या पत्नीची हत्या करायची आहे, असे गौतमला सांगण्यात आले. दीपिका शर्माची हत्या करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचा सौदा ठवरण्यात आला. त्यासाठी वीस हजार रुपये आगाऊचे देण्यात आले.
दरम्यान या हत्येचा उलगडा करण्यासाठी एसडीपीओच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पोलिसांनी मृत महिलेचा दीर छोटू शर्मा, सासरा राजीव कुमार तसेच सुमित कुमार यांचे कॉल डिटेल्स तपासले. त्यानंतर या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आले.
इतर बातम्या :