
हिसारची माजी विश्वविजेती बॉक्सर स्वीटी बुरा हिने तिचा कबड्डीपटू पती दीपक हुड्डावर गंभीर आरोप केले आहेत. पॅनीक अटॅकमुळे काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर जेव्हा तिला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा स्वीटी बुराने पती दीपक हुड्डा विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. तिने तक्रार करताना पतीवर गंभीर आरोप केले आहेत जे पाहून सर्वांना धक्का बसला आहे.
पती दीपक हुड्डा मला कपडे काढायला लावायचा आणि रात्रभर मारहाण करायचा. उशी तोंडावर दाबून मला मारायचा. माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत. त्याने माझ्या घरातून बाहेर जाण्यावर देखील बंदी घातली होती. तसेच दीपक हुड्डा पाच-पाच दिवस घरात कोंडून ठेवायचा. त्याने माझी कार आणि मोबाईल फोनही काढून घेतला होता असा आरोप स्वीटी बुराने केला आहे.
यापूर्वी स्वीटीने दीपकवर तो गे असल्याचा आरोप केला होता. स्वीटीने सांगितले की, माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. ज्यामध्ये तो मुलांशी संबंध ठेवताना दिसत आहे. हे पुरावे मी न्यायालयात सादर करणार आहे आणि या आधारे दीपक हुड्डाकडे घटस्फोट मागणार आहे. जेव्हा मी दीपकला व्हिडीओबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो मला मारहाण करु लागला. सगळे सहन करूनही मी गप्प राहिले. मी माझ्या घरच्यांना एक-दोनदा मारहाणीची घटना सांगितली, तेव्हा ते म्हणायचे की तूच त्याला शोधले आहेत मग आता तुम्हीच बघा. त्यामुळे मी गप्पपणे सहन करायचे. पण आता मी गप्प बसणार नाही.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
स्वीटी पुढे म्हणाली, मी लव्ह मॅरेज केले होते, त्यामुळे मला सर्व काही सहन करावे लागले. १५ मार्च रोजी स्वीटी आणि दीपक हिसारच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. येथे स्वीटीने दीपक हुड्डाला मारहाण केली होती. ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दीपकच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात स्वीटी, तिचे वडील आणि मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर स्वीटीने सांगितले की, व्हिडिओची सुरुवात आणि शेवट दिसत नाही, ज्यामध्ये दीपक मला शिवीगाळ करत होता. व्हिडिओ एडिट करून माझ्याविरुद्ध वापरण्यात आला आहे. या प्रकरणात दीपकसोबत पोलिसांचाही सहभाग आहे. यानंतर स्वीटीला पॅनीक अटॅक आला आणि तिला हिसार येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.