टिटवाळ्यात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या

टिटवाळ्यात चोरट्यांनी हैदोस मांडला आहे. चोरटे दुचाकीवरुन येतात, घरफोड्या करतात आणि पसार होतात. यामुळे नागारिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिटवाळ्यात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोड्या
टिटवाळ्यात एकाच रात्रीत चार घरफोड्या
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 01, 2023 | 10:46 AM

टिटवाळा / सुनील जाधव : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन दुचाकीवरून येणाऱ्या सहा चोरांची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. या चोरट्यांनी एकाच रात्री टिटवाळा गणपती मंदिराशेजारी असलेल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रखुमाईचे दोन किलो वजनाचे चार चांदीचे मुकुट चोरी केले. इतकेच नाही तर मंदिराच्या परिसरातील जवळजवळ चार ठिकाणी घरफोड्या केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्यात मंदिरात चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

विठ्ठल मंदिरातील चांदीचे मुकुटही चोरले

टिटवाळा शहर महागणपती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. मात्र या परिसरात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांचा हैदोस सुरू झाला आहे. मंदिर परिसरात दोन दुचाकीवरून आलेल्या सहा चोरांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा कडी कोयंडा तोडून मंदिराच्या आत प्रवेश केला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर उडवत विठ्ठलाच्या शिरपेचात असलेले चांदीचे मुकुट चोरले.

टिटवाळ्यात एकाच परिसरात चार ठिकाणी घरफोड्या

चोरीच्या या घटनेने भक्तगणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे या चोरट्यांनी मांडा टिटवाळ्यात परिसरात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या केल्या. या घरफोड्या केल्याचे एका सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आले असून, टिटवाळा वासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तपास अंतिम टप्प्यात सुरू असून लवकरच चोरट्यांना अटक केली जाणार असल्याचे, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.