वादावादीत मध्यस्थी भोवली, रेस्टॉरंट मालकाची गोळी झाडून हत्या

| Updated on: Sep 02, 2021 | 3:40 PM

ऑर्डरला उशीर झाल्यामुळे मद्यधुंद अवस्थेतील काही जणांनी नारायणला शिव्या द्यायला सुरुवात केल्याचा आरोप आहे. यावर रेस्टॉरंट मालक सुनील घटनास्थळी आला आणि त्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र नारायणशी भांडणाऱ्यांनी मध्यस्थी करणाऱ्या सुनीलच्या डोक्यात गोळी झाडली,

वादावादीत मध्यस्थी भोवली, रेस्टॉरंट मालकाची गोळी झाडून हत्या
दिल्लीत रेस्टॉरंट मालकाची हत्या
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये रेस्टॉरंट मालकाची गोळी घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. आरोपी रेस्टॉरंटच्या बाहेर ऑर्डरची वाट पाहत होते, परंतु ऑर्डर देण्यास उशीर झाल्याने वादावादी होऊन एकाने रेस्टॉरंट मालकाला गोळ्या घातल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या बीटा -2 पोलीस स्टेशन परिसरातील मित्रा सोसायटीत घडली. 45 वर्षीय सुनील ‘झमझम’ नावाचे रेस्टॉरंट चालवत होता. या रेस्टॉरंटमधून ऑनलाईन फूड डिलीव्हरी होते. या रेस्टॉरंटमध्ये काम करणारा नारायण आणि डिलीव्हरीसाठी आलेल्या काही जणांमध्ये मंगळवारी रात्री 12.15 वाजताच्या सुमारास वाद झाला. त्यावेळी एक डिलीव्हरी बॉयही तिथे उपस्थित होता.

नेमकं काय घडलं?

घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, मंगळवारी रात्री काही जण चिकन बिर्याणी आणि पुरी भाजीची ऑर्डर घेण्यासाठी तिथे उभे होते. चिकन बिर्याणीची ऑर्डर वेळेत देण्यात आली होती, तर पुरी भाजीच्या ऑर्डरला आणखी काही वेळ लागेल असे सांगण्यात आले.

मध्यस्थी करणाऱ्या मालकावरच गोळीबार

ऑर्डरला उशीर झाल्यामुळे मद्यधुंद अवस्थेतील काही जणांनी नारायणला शिव्या द्यायला सुरुवात केल्याचा आरोप आहे. यावर रेस्टॉरंट मालक सुनील घटनास्थळी आला आणि त्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र नारायणशी भांडणाऱ्यांनी मध्यस्थी करणाऱ्या सुनीलच्या डोक्यात गोळी झाडली, ज्यामुळे तो जागीच पडला. नारायणने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने सुनीलला जखमी अवस्थेत यथार्थ हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपींचा शोध सुरु

त्याचवेळी आरोपी घटनेनंतर फरार झाला. पोलिस जवळील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे. घटनेच्या वेळी तेथे उपस्थित डिलिव्हरी बॉयचीही चौकशी सुरू आहे.

दिल्लीतील वेटरच्या हत्येची घटना ताजी

रेस्टॉरंटमध्ये वेटरची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच राजधानी दिल्लीत उघडकीस आली होती. पार्सल नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी वाद झाल्यानंतर वेटरवर गोळीबार केल्याचा आरोप झाला होता. गोळीबारात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार

दुसरीकडे, पुण्यातील गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मालकाची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला.

संबंधित बातम्या :

ग्राहकांसोबत क्षुल्लक वाद, 18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला

VIDEO | मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या