Delhi Blast : 3 मुलांचा पिता, म्हाताऱ्या आईचा आधार… दिल्ली ब्लास्टमध्ये घरातल्या कर्त्या पुरूषाचा दुर्दैवी अंत !

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या बॉम्बस्फोटात अमरोहा येथील बस कंडक्टर अशोक कुमार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबाचा एकमेव आधार असलेले अशोक, यांच्या मागे पत्नी, तीन लहान मुले आणि वृद्ध आई आहेत. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. या घटनेचा तपास वेगाने सुरू आहे.

Delhi Blast : 3 मुलांचा पिता, म्हाताऱ्या आईचा आधार... दिल्ली ब्लास्टमध्ये घरातल्या कर्त्या पुरूषाचा दुर्दैवी अंत !
दिल्ली स्फोटात कुटुंबाने गमावला आधार
| Updated on: Nov 11, 2025 | 12:22 PM

सोमवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाने (Delhi Blast)  संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक लोक जखमी झालेत. या दुर्दैवी घटनेत उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी अशोक कुमार (वय 34) यांच्या दुःखद मृत्यूने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.दिल्लीत बस कंडक्टर म्हणून काम करणारा अशोक नेहमीप्रमाणे आपले काम पूर्ण करून घरी परत येत होता. पण काल त्याचे नशीब सोबत नव्हतं आणि एका स्फोटात सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्याच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाचा आधार निघून गेला.

कुटुंबावर शोककळा

मृत अशोकचे वडिलोपार्जित घर अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मंगरोला गावात आहे. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते आणि अशोक त्याच्या वृद्ध आईचा आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा एकमेव आधार होता. मात्र आता त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या आईला मात्र ही दु:खद बातमी अद्याप दिलेली नाही. वृद्ध आईची तब्येत अद्याप नाजूक असल्याने त्यांना मुलाच्या जाण्याबद्दल कळवलेलं नाही. अशोक यांच्या अकस्मात जाण्यामुळे गावातील प्रत्येकाचे डोळे अगदी पाणावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुलं आहेत. ते दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होते. त्याच्या पगारातून कुटुंबाचा सर्व खर्च भागत असे.नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, तो खूप कष्टाळू माणूस होता, कामानंतर दररोज कुटुंबासाठी सामान घेऊन घरी परतत असे. अशातच त्याच्या अकस्मात मृत्यूची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी साश्रूनयनांनी दिली.

अशोकचा चुलत भाऊ सोमपाल शर्मा म्हणाला की, टीव्हीवर स्फोटाची बातमी झाल्यानंतरच पोलिस गावात आले आणि कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. आम्हाला टीव्हीवरून कळलं की दिल्ली बॉम्बस्फोटात अमरोहा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं. काही वेळाने पोलिस आले आणि त्यांनी नावाची पुष्टी केली.हे अगदी दुर्दैवी आहे; एवढी मोठी चूक कशी झाली असेल? पीडितया कुटुंबाला सरकारने पुरेशी भरपाई द्यावी आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे. अशोक सारखा साधा-सुधा माणूस या स्फोटाची शिकार झाल्याने सर्वांच्या डोळयांत अश्रू आहेत.

अनेक नेटवर्क उघडकीस

दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासात काश्मीरपासून फरीदाबाद आणि लखनऊपर्यंत पसरलेले नेटवर्क उघडकीस आले आहे. दिल्ली पोलिसांनी मृतांची ओळख जाहीर करताच, अमरोहा पोलिसांनी कारवाई सुरू केली. स्थानिक पोलिसांचे एक पथक मंगरोला गावात पोहोचले आणि त्यांनी अशोकच्या कुटुंबीयांकडे त्याची जीवनशैली, नोकरी आणि दिल्लीतील मित्रांबद्दल विचारपूस केली. स्फोट झालेल्या ठिकाणी अशोक त्या दिवशी कोणत्या मार्गाने गेला आणि तो तिथे कसा पोहोचला याचाही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

गावात सन्नाटा, नातेवाईक दिल्लीला रवाना

या भयानक घटनेची बातमी पसरताच, मंगरोला गावावर शोककळा पसरली. सर्व गावकरी अशोकच्या घराबाहेर जमले. महिला असह्य होऊन रडत होत्या. कालपर्यंत दररोज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करणारा माणूस आता जिवंत नाही यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. अशोकच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी होताच त्याची पत्नी व भाऊ दिल्लीला रवाना झाले. पोस्टमॉर्टम नंतर त्याचा मृतदेह गावी आणण्यात येईल.

दोन कुटुंबांचा उचलायचा भार

अशोक केवळ त्याच्या मुलांचा आणि पत्नीचा आधार नव्हता तर त्याच्या धाकट्या भावाची आणि वृद्ध आईची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर होती. मी सगळं सांभाळून घेईन असं तो नेहमी म्हणायचा, पण आता तोच आधार निखळून पडलाय. अशोकचं जाणं हे संपूर्ण गावासाठी दु:खद आहे. त्याच्या कुटुंबियांसाठी योग्य ती मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

शेवटचा कॉल कधी

अशोकच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांना कालच (सोमवारी) त्याचा फोन आला होता. आता मी लवकरच घरी परत येईन, मुलांसाठी बिस्किटे आणि दूध आणले होतं, असं त्याने सांगितलं. पण थोड्याच वेळात टीव्हीवर बॉम्बस्फोटाची बातमी आली आणि अशोकचा आवाज नाही तर त्याच्या मृत्यूची बातमी कानावर आली , संपूर्ण गाव दु:खात आहे.