
एका काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका महिला SWAT कमांडोची पतीने हत्या केली. 27 वर्षीय कमांडो काजलला पतीने हुंड्यासाठी संपवलं. हत्येच्यावेळी काजल चार महिन्यांची गर्भवती होती. आरोपी पती संरक्षण मंत्रालयात क्लार्क आहे. लोखंडाच्या डंबेल्सने वार करुन त्याने पत्नी आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाला क्रूरपणे संपवलं. दिल्लीमधील ही भयानक घटना आहे.
काजल आणि अंकुरची लव्ह स्टोरी 2022 मध्ये एकत्र शिक्षण घेत असताना सुरु झाली. प्रेम बहरलं. दोघांनी नातेवाईकांची समजूत घालून लग्न केलं. लग्नाच्यावेळी दोघेही सरकारी नोकरीत होते. काजल दिल्ली पोलीस दलात कमांडो बनली. अंकुर संरक्षण मंत्रालयात क्लार्क पदावर होता. पण लग्नानंतर 15 दिवसात प्रेमाचा बुरखा उतरला. पती अंकुर आणि त्याच्या कुटुंबाने काजलकडे रोख रक्कम तसचं गाडीची मागणी सुरु केली. काजलला सतत अपमानित केलं जात होतं. हद्द तर तेव्हा झाली 22 जानेवारीला अंकुरने काजलच्या भावाला फोन करुन थंड डोक्याने सांगितलं, ‘मी काजलला मारुन टाकलय तू येऊन तिचा मृतदेह घेऊन जा’
आई-वडिलांच्या नावाने कर्ज घेतलेलं
हे सर्व सांगताना काजलच्या वडिलांचे डोळे भरुन आलेले. त्यांची मुलगी मोठ्या मेहनतीने दिल्ली पोलीस दलात कमांडो बनली होती. “माझी मुलगी 4 महिन्याची गर्भवती होती. स्वार्थी पतीने लोखंडी डंबेल्सने तिच्या डोक्यावर वार केले. त्याने आई आणि तिच्या पोटातील बाळ दोघांना संपवलं” असं काजलच्या वडिलांनी सांगितलं. काजलने सासरच्या 10 लाख रुपये देण्यासाठी तिच्या आई-वडिलांच्या नावाने कर्ज घेतलेलं असं काजलची आई मीन देवी यांनी सांगितलं.
पाणावलेल्या डोळ्यांनी तिला अखेरचा निरोप
आज काजलचं पार्थिव तिच्या गावी ‘बड़ी’ गन्नौर येथे पोहोचलं. संपूर्ण गावात शोकमग्न वातावरण होतं. एकीकडे देशसेवा करणाऱ्या कमांडो मुलीला गमावल्याचं दु:ख होतं. दुसरीकडे हुंडा मागणाऱ्यांविरोधात आक्रोश. राजकीय सम्मानात काजलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाणावलेल्या डोळ्यांनी तिला अखेरचा निरोप दिला.