पंढरपूर: दर्शन रांगेत भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून बेदम मारहाण; भाविक रक्तबंबाळ

पंढरपुरातील गोपाळपूर रोडवरील पत्राशेडजवळ नागपूरहून आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. यात भाविक गंभीर जखमी झाला आहे.

पंढरपूर: दर्शन रांगेत भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून बेदम मारहाण; भाविक रक्तबंबाळ
Security gaurd beat devotee
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jul 07, 2025 | 7:41 PM

पंढरपुरातील गोपाळपूर रोडवरील पत्राशेडजवळ विठ्ठल दर्शनासाठी उभारलेल्या रांगेत आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. नागपूरहून आलेल्या भाविकाला बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत भाविक गंभीर जखमी झाला असून त्याच्या दंडावर आणि पाठीवर मार लागल्याची माहिती आहे.

या मारहाणीबाबत मंदिर प्रशासनाला विचारणा केली असता मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी, ‘मी या विषयावर बोलणार नाही म्हणत पत्रकार रवी लव्हेकर यांच्या हातून मोबाईल काढून घेत काय करायचे ते करा असे उर्मट वर्तन केले, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे यांनी या विषयाचा आवाज उठवत मंदिर समितीने फिर्यादी होऊन संबंधित सुरक्षारक्षक रोहित कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तसेच बीव्हीजी कंपनीचे व्यवस्थापक कैलास देशमुख यांनी सुरक्षारक्षक रोहित कुंभार याला पोलिसांच्या ताब्यात दिले असून कामावरून काढले असल्याचे सांगितले.

दर्शनासाठी तासनतास उभा असलेल्या भाविकावर सुरक्षा रक्षकाने अचानकपणे हल्ला केल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमी भाविक रक्तबंबाळ अवस्थेत असतानाच इतर भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली आणि संबंधित रक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. या आधीही अशा प्रकारच्या चार ते पाच घटना घडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मुजोर रक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे सांगितले असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कर्मचारी प्रशिक्षणावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या रक्षकांकडूनच अशा प्रकारचे वर्तन होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे असे विधान वारकऱ्यांनी केले.