रात्रीस खेळ चाले! पीक कर्ज योजनेचे पैसे घरात ठेवले अन् तेवढ्यातच… धुळ्यात नेमकं काय घडलं?

धुळे तालुक्यातील वरखेडी गावात रात्रीच्या वेळी दोन वेगवेगळ्या घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. किशोर धनगर आणि महेंद्र पाटील यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

रात्रीस खेळ चाले! पीक कर्ज योजनेचे पैसे घरात ठेवले अन् तेवढ्यातच... धुळ्यात नेमकं काय घडलं?
| Updated on: Aug 30, 2025 | 6:26 PM

गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात रात्री चोरी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता धुळे तालुक्यातील वरखेडी गावात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल दोन ठिकाणी चोरी केली आहे. या चोरीत चोरट्यांनी काजू-बदाम, २९ ग्रॅम सोने, ११० भार चांदी आणि २ लाख रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. तसेच ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

धुळ्यातील वरखेडी येथील बहिरम मंदिराशेजारी राहणारे शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक किशोर शिवराम धनगर यांच्या घरी ही घटना घडली. किशोर धनगर हे रात्री घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असताना चोरट्यांनी मागच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर कपाटातून शेतीसाठी घेतलेले दीड लाख रुपये आणि डेअरीसाठी घेतलेले पन्नास हजार रुपये, अशी एकूण २ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

याचवेळी, चोरट्यांनी घरातील २६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यात टोंगल, साखळ्या, चेन आणि अंगठी हे देखील चोरी केले. त्यासोबच १०० भार चांदी देखील चोरली. किशोर धनगर यांचे आई-वडील पशुपतीनाथ देवदर्शनासाठी बाहेर गेले असताना ही चोरी झाली. चोरी केल्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.

एकाच दिवशी दोन घटना

तर दुसरीकडे किशोर धनगर यांच्या घराला लागूनच असलेल्या महेंद्र लुका पाटील यांच्या वृंदावन निवास येथेही चोरट्यांनी हात साफ केला. चोरट्यांनी कंपाऊंडमध्ये उडी मारून घराबाहेरील कॅमेऱ्यांची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी देव्हाऱ्यातील चांदीच्या देव-देवतांच्या माळा, ७ भार चांदीचे लहान कडे, २ ते ३ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी.व्ही.आर.देखील चोरला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी किचन रूममधील लाडू, काजू आणि बदामदेखील सोडले नाहीत.

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या तपासामध्ये ठसे तज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली आहे. पुढील तपास सध्या सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.