
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली हा परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललं आहे. या ठिकाणी सातत्याने हत्या, आत्महत्या, चोरी, खून, दरोडे अशा घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत एका हत्याकांडाने खळबळ उडाली होती. आता यात एक नवीन माहिती समोर आली आहे. डोंबिवली येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या झाल्याचे करून फरार झालेल्या पतीने ट्रेनसमोर उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलिसांनी या आरोपीचा शोध कसा घेतला आणि या गुन्ह्याचा उलगडा कसा झाला, याची सविस्तर माहितीही समोर आली आहे.
डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात पोपट दिलीप दहिज आणि त्यांची पत्नी ज्योती दहिज हे राहत होते २६ नोव्हेंबरच्या आसपास त्यांच्या घरात पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झाले. हा कौटुंबिक वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात आलेल्या पोपट याने पत्नी ज्योती हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर ज्योतीचा मृतदेह घरातच सोडून पोपट दहिज घरातून फरार झाला.
यानंतर दुसऱ्या दिवशी मानपाडा पोलिसांना कोळेगाव येथील फ्लॅटमध्ये ज्योती दहिज यांचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. तेव्हा पोलिसांना पती पोपट दहिज हा घरातून गायब असल्याचे समजले. यावेळी पोलिसांना प्राथमिक तपासात ज्योतीचा गळा दाबून खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पोपटवर IPC कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
पोपट हा गंवडी काम करत होता. यानंतर पोलीस पोपटच्या कामाच्या ठिकाणी गेले, तेव्हा तो तिथेही हजर नसल्याचे आढळले. यामुळे पोलिसांना या हत्येमागे पोपटचाच हात असल्याचा संशय बळावला. पोलीस पोपटचा शोध घेत असताना त्यांना भांडुप रेल्वे स्थानकावरून माहिती मिळाली की एका अज्ञात व्यक्तीने लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. मानपाडा पोलिसांनी तातडीने भांडूप येथे धाव घेतली.
यावेळी त्यांना आत्महत्येच्या ठिकाणी मृत व्यक्तीच्या शरीराजवळ तुटलेल्या अवस्थेत असलेला मोबाईल फोन मिळाला. या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली. यानंतर आत्महत्या करणारा तो व्यक्ती दुसरा कोणी नसून, पत्नी ज्योतीची हत्या करून फरार झालेला आरोपी पोपट दिलीप दहिजच असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासानुसार, पत्नीची हत्या केल्यानंतर पोपट दहिज प्रचंड तणावात होता. पोलीस आपल्या मागावर आहेत याची भीती त्याला होती. याच तणावातून आणि पश्चात्तापातून त्याने भांडूप रेल्वे स्थानकावर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली असावा, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेमुळे कोळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून मानपाडा पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.