Dombivli Crime: प्रेयसीने नाते संपवलं, प्रियकाने घर पेटवलं, भयंकर घटनेने डोंबिवलीत खळबळ
वादानंतर प्रेयसी तरुणीने यापुढे दिपेश रस्तोगी याच्याशी संबंध ठेवायचा नाही असा निर्णय घेतला. प्रेयसीने अचानक संबंध संपवल्याचा राग दिपेशच्या मनात होता. याच रागातून त्याने भयंकर कट रचला.

सुनील जाधव, प्रतिनिधी: प्रेमभंग, प्रेयसीने प्रेमसंबंध संपवल्याचा राग अन् प्रियकराने घेतलेला हादरवणारा निर्णय. डोंबिवलीमध्ये एका प्रेमवेड्या प्रियकराने आपल्या प्रेयसीचे घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आगीमधून प्रेयसीचे आई अन् वडील थोडक्यात बचावलेत. याबाबतची माहिती मिळताच आरोपी प्रियकर दिपेश रस्तोगी याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा…
नेमकं काय आहे प्रकरण?
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियकर आरोप दिपेश रस्तोगी याचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंंबंध होते. मात्र काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले. या वादानंतर प्रेयसी तरुणीने यापुढे दिपेश रस्तोगी याच्याशी संबंध ठेवायचा नाही असा निर्णय घेतला. प्रेयसीने अचानक संबंध संपवल्याचा राग दिपेशच्या मनात होता. याच रागातून त्याने भयंकर कट रचला.
दिपेश रस्तोगीने रागाच्या भरात प्रेयसीच्या घराला आग लावली. घरात आग लागल्यानंतर तरुणीसह तिचे आई- वडील संकटात सापडले. मात्र सुदैवाने तिघेही या घटनेतून बचावले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला अटक केली असून, प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या या घटनेची सध्या डोंबिवली परिसरात चर्चा होत आहे.