माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा, जामीनाच्या निर्णयावर न्यायालय म्हणाले…

| Updated on: Jun 05, 2023 | 4:47 PM

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्रदीप शर्मा हे अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत.

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा, जामीनाच्या निर्णयावर न्यायालय म्हणाले...
प्रदीप शर्मा यांना अंतरिम जामीन मंजूर
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. पुण्याच्या येरवडा कारागृहात असलेले शर्मा यांना पुढील तीन आठवड्यांसाठी त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शर्मा यांना 29 मे रोजी नव्याने अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार शर्मा यांच्या वकिलांनी नव्याने अर्ज केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती राजेश जिंदल यांच्या खंडपीठाने सोमवारी शर्मा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पत्नीची तब्येत खालावतेय, तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज

प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या पत्नीच्या आजारपणाकडे लक्ष वेधत अंतरिम जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. माझ्या पत्नीची तब्येत दिवसेंदिवस अधिक खालावत चालली आहे. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे मला तिला भेटण्यासाठी परवानगी द्या, जेणेकरून शस्त्रक्रियेनंतरच्या काळात तिच्या प्रकृतीची विशेष काळजी घेता येईल, अशी विनंती प्रदीप शर्मा यांनी केली होती. न्यायालयाने मानवतावादी दृष्टीकोनातून आपल्या जामीन अर्जाचा विचार करावा, असेही साकडे त्यांनी घातले होते. त्यांच्या अर्जावर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी बाजू मांडताना जामीन मंजूर करण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. मात्र न्यायालयाने मानवतावादी आधारावर शर्मा यांचा अर्ज मंजूर केला.

कनिष्ठ न्यायालयाने आखून दिलेल्या अटी-शर्थींचे पालन करूनच शर्मा यांना तुरुंगातून सोडण्यात यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. शर्मा यांना याआधी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

काय आहे प्रकरण?

25 फेब्रुवारी 2021 रोजी ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. तसेच 5 मार्च 2022 रोजी ठाण्यातील एका खाडीत व्यापारी मनसुख हिरेनचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाच्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरु असून, प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींमध्ये बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा समावेश आहे.