
बॉलीवूड स्टार सलामन खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार आणि बाबा सिद्दीकी ( Baba Siddique Murder) यांच्या हत्येच्या कटाशी संबंधित कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईला (Anmol Bishnoi) बनावट रशियन पासपोर्टसह अटक करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कॅनेडियन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली ही व्यक्ती, खरोखरच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे का, याची पडताळणी केली जात आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घरावर गेल्या वर्षी झालेल्या गोळीबारासह अनेक हाय-प्रोफाईल केसेसमध्ये वाँटेड असलेला फरार गुंड अनमोल बिश्नोई अखेर ताब्यात आला आहे का? कॅनेडियन अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून तो खरोखरच (तुरुंगात कैदेत असलेल्या) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे का, याची पडताळणी भारतीय सुरक्षा संस्थांकडून केली जात आहे. हा गँगस्टर अनमोल बिश्नोईच असण्याची अधिक शक्यता वर्तवली जात असली तरीही मुंबई पोलीस अद्याप अधिकृत माहितीची वाट पाहत आहेत.
मिड-डे दिलेल्या वृत्तानासर, त्या संशयित व्यक्तीकडे रशियन पासपोर्ट आढळला, मात्र तो बनावट असू शकतो असा संशय तपासकर्त्या अधिकाऱ्यांना आहे. अटक करण्यात आलेल्या त्या माणसाचा एक फोटो भारतीय अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्यात आला असून दोघांमधील साम्य पाहता तो व्यक्ती हा अनमोल असण्याचीच शक्यता व्यक्त होत आहे.
सलमानच्या घरावर गोळीबार
गेल्या वर्षी, म्हणजेच 14 एप्रिल 2025 रोजी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमनच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांनी प्रसिद्ध राजकारणी बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणांसह अनेक केसेसमध्ये अनमोल बिश्नोई हा वाँटेड आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी आणि अपहरणापासून ते खूनापर्यंतचे 32 हून अधिक गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये राजस्थानमधील तब्बल 20 गुन्ह्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी, अनमोलला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये काही काळासाठी ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली. मात्र आता कॅनडामध्ये त्याच्या उपस्थितीमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. आमच्याकडे अद्याप “अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही” असे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं.
पण बिश्नोईच्या परदेशातील कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, कॅनडा हा दीर्घकाळापासून त्यांच्या प्रमुख बेसपैकी एक आहे. ” (त्यामुळे अनमोल बिश्नोईची) कॅनडामध्ये उपस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रशियन पासपोर्टसह ताब्यात घेतलेला माणूस बनावट ओळखपत्राने प्रवास करत असावा अशी माहिती कॅनेडियन अधिकाऱ्यांनी त्यांच्या भारतीय समकक्षांना (Counterparts) दिली.
मात्र तरीही तपासकर्त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. “गेल्या वर्षी जेव्हा अनमोलला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याचा माग काढण्यासाठी काही यंत्रणा तयार करण्यात आल्या होत्या, त्यामुळे कोणाच्याही लक्षात न येता सीमा ओलांडणे (त्याच्यासाठी) कठीण होते” असे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र असे असले तरीही “अमेरिकेतून कॅनडाला जाणं (तुलनेने) सोपं आहे. – आणि बिश्नोई नेटवर्क तिथे सक्रिय आहे.” असा युक्तिवाद दुसऱ्या अधिकाऱ्याने केला.
NIA ने जाहीर केलं 10 लाखांचं बक्षीस
सलमान खान गोळीबाराची ऑनलाइन जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि नंतर बाबा सिद्दीकीच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्यांशी जोडल्यानंतर अनमोल मुंबई पोलिसांच्या रडारवर आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गेल्या वर्षी अनमोलची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि बिश्नोई टोळीच्या परदेशातील कारवायांशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने अलीकडेच विशेष मकोका न्यायालयाला दिली होती. या सर्व घडामोडींदरम्यान आता कॅनडामध्ये त्याला अटक करण्यात आल्याच्या शक्यतेने खळबळ माजली असून त्यासंदर्भातील अपडेट्सवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.