चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री?

| Updated on: Oct 16, 2021 | 8:18 PM

देशाची राजधानी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या नोएडा शहरात गुरुवारी (14 ऑक्टोबर) रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्याने कार चालत असताना तिचं स्टेअरिंग अचानक लॉक झालं.

चालत्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली आणि महिला डॉक्टरने जीव गमावला, नेमकं काय घडलं त्या रात्री?
सांकेतिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या नोएडा शहरात गुरुवारी (14 ऑक्टोबर) रात्री एक भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्याने कार चालत असताना तिचं स्टेअरिंग अचानक लॉक झालं. त्यामुळे चालकाला सुरुवातीला नेमकं काय झालं तेच कळालं नाही. तो गोंधळात पडला. त्याला स्टेअरिंग लॉक झाल्याचं जोपर्यंत समजलं तोपर्यंत बराच उशिर झाला होता. कारण त्याचा कारवरचा ताबा सुटला होता. त्यामुळे कार थेट दुभाजकाला जोरात धडकली. या अपघातात कारचालक तर बचावला. पण त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटनेतील मृतक महिलेचं नाव शिखा भटनागर आहे. तर कारचालकाचं नाव शैवाल भटनागर असं आहे. दोघं पती-पत्नी आहेत. शैवाल हे इंजिनिअर आहेत. तर त्यांची पत्नी शिखा ही होमियोपॅथिक डॉक्टर होत्या. भटनागर दाम्पत्य ग्रेटर नोएडा पश्चिमेतील पंचशील ग्रीन्स सोसायटीत वास्तव्यास होते. ते गुरुवारी संध्याकाळी काही कामानिमित्ताने एकत्र कारने गेले होते. तिथून परतत असताना रात्री उशिरा संबंधित दुर्घटना घडली.

महिलेने सीट-बेल्ट न घातल्याने जास्त इजा

शैवाल भटनागर घरी परतत असताना गाडी चालवत होते. ते 130 मीटर रोडवर एच्छर पोलीस ठाण्याजवळ आले त्यांच्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली. त्यामुळे शैवाल यांचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. या दुर्घटनेत शैवाल आणि त्यांची पत्नी शिखा जखमी झाले. पण शिखा यांनी सीट-बेल्ट न घातल्यामुळे त्यांना जास्त इजा पोहोचली.

पोलिसांनी दाम्पत्याला रुग्णालयात नेलं, पण…

संबंधित घटनेनंतर शैवाल यांनी पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मदतीसाठी 112 क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागत नव्हता. अखेर त्यांनी एका मित्राला फोन करुन संबंधित घटनेची माहिती सांगितली. त्यांच्या मित्राने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भटनागर दाम्पत्याला गाडीतून बाहेर काढत जवळील रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. रुग्णालयात गेल्यानंतर जखमी असलेल्या शिखा भटनागर यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे भटनागर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे शैवाल यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेवर संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

श्रीरामांच्या विरहात दशरथ राजाने मंचावर प्राण सोडला, ‘रामलीला’त चटका लावून जाणारी खरी एक्झिट, सहकलाकार-प्रेक्षकांचा आक्रोश

भरधाव पिकअप बॅरिकेट्स तोडून थेट दुकानात शिरली, एकाचा मृत्यू, दुकानाचं प्रचंड नुकसान