
Crime News: लग्नासाठी फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत असतात. परंतु शासकीय नोकरीत अधिकारी आहे, आपल्याकडे लाल दिव्याची गाडी आहे, असे फोटो पाठवून मुलींची फसवणूक करण्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातून उघड झाला आहे. धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे या तरुणाने लग्नासाठी सहा तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आले आहे. या प्रकरणात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याला अटकही झाली आहे.
नाशिक व फलटणच्या तरुणींनी जळगावात पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. जळगावच्या धरणगाव येथील निनाद कापुरे या तरुणाने आपण नायब तहसीलदार आहोत, क्लास वन अधिकारी आहोत, असे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. निनाद कापुरे याने सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो तरुणींना पाठवले. तसेच दोन तरुणींकडून एकूण १५ लाख उकळून फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. हे सर्व फोटो व पैशाचे पुरावे जळगावात पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत.
निनाद कपुरे याला फलटणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. नाशिकच्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून तरुणीने तक्रार केली आहे. आतापर्यंत निनाद याने अशाच प्रकारे सहा तरुणींना फसवले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
आरोपी निनाद कापुरे याने मेट्रोमोनिअल साईटवर प्रीमियम अकाउंट घेतले होते. त्यावरुन तो तरुणींची फसवणूक करत होता. खोटी प्रोफाइल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर निनाद कापुरे याच्यावर फलटण व नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत निनादने नेमकी किती मुलींची फसवणूक केली, हे समोर येण्याची शक्यता आहे.