लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलचं अमेरिकेतून प्रत्यार्पण; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात होणार मोठे खुलासे?

अनमोल बिश्नोईवर काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. तर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही अनमोलचं नाव समोर आलं होतं. अनमोलच्या प्रत्यार्पणानंतर या सर्व प्रकरणांच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलचं अमेरिकेतून प्रत्यार्पण; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात होणार मोठे खुलासे?
लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 19, 2025 | 11:15 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येत आहे. याबद्दलची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली होती. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर एप्रिल 2024 मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोई प्रमुख आरोपी आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकेकडे दोन प्रस्ताव पाठवले होते. त्याला मंजुरी मिळाली असून बिश्नोईचं भारतात प्रत्यार्पण करण्यात येत आहे. अनमोल बिश्नोईवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याची चौकशी प्रथम कोणती यंत्रणा करेल याबाबतचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याला अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलं असून त्याला लवकरच दिल्ली एअरपोर्टवर आणलं जाईल. त्याच्यासोबतच डिपोर्ट केलेल्या इतरही काही जणांना त्याच फ्लाइटमधून आणलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार NIA ची टीम अनमोल बिश्नोईला घेण्यासाठी टर्मिनल 3 वर पोहोचली आहे. प्रक्रियेनुसार, दिल्ली पोहोचताच अनमोलला NIA ताब्यात घेईल. अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांची चौकशी त्याच्याकडून केली जाणार आहे. त्यामुळे त्याला कोणत्या एजन्सीच्या ताब्यात दिलं जावं, याचा निर्णय केंद्र सरकार करणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भातही अनमोलची चौकशी होणार आहे. त्यामुळे मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनमोल अमेरिका आणि कॅनडादरम्यान वारंवार आपलं स्थान बदलत होता. त्याच्याकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवलेला रशियन पासपोर्टसुद्धा आहे. एनआयएनं त्याला पकडण्यासाठी 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं.

2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातही अनमोल बिश्नोईचं नाव समोर आलं होतं. 12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात मकोकाच्या कडक तरतुदीदेखील लागू केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आली. तर अनमोल बिश्नोई, शुभम लोणकर आणि झीशान मोहम्मद अख्तर हे आतापर्यंत वाँटेड होते. आता अनमोलच्या प्रत्यार्पणानंतर या सर्व प्रकरणांचा तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.