
अहमदाबाद : गौतम अदानी यांच्याकडून खंडणी मागितल्याचा किस्सा तसा अनेकांना माहित आहे, खास करुन त्यावेळी पत्रकारितेत असललेल्या लोकांना आणि त्या भागातील आयपीएस अधिकाऱ्यांना आजही तो किस्सा आठवतो. ही घटना १९९८ सालची आहे,तेव्हा गौतम अदानी यांना बंदूक दाखवून, त्यांचं अपहरण करण्यात आलं. असं म्हणतात की अपहरण केल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी अपहरणकर्त्यांनी १५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही घटना अहमदाबाद शहरातील आहे.ही घटना खंडणीची असली तरी रंजक म्हणावी लागेल, कारण अनेक तास गौतम अदानी हे अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होते.
गौतम अदानी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी १९९८ रोजी आपल्या मित्रासोबत अहमदाबादमधील कर्णावती क्लबला बसले होते, ते तेथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा रस्त्यातच त्यांचं अपहरण करण्यात आलं. कर्णावती क्लब हा अहमदाबाद शहरातील सर्वात मोठा क्लब मानला जातो.
कर्णावती क्लबमधून जेव्हा गौतम अदानी बाहेर निघाले, तेव्हा त्यांची गाडी काही मीटर अंतरावर गेली असेल, तेव्हा तिच्या पुढे मोटरसायकल आडवी लावण्यात आली. अदानी यांनी गाडी थांबवली तेव्हा बाजूला एक मारुती वॅन आली, त्या गाडीतून सहा जण खाली उतरले. तेव्हा त्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारुती वॅनमध्ये बसण्यास सांगण्यात आलं. अपहरणानंतर त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आलं. अपहरणानंतर ३ दिवसांनी गौतम अदानी घरी परतले, गौतम अदानी यांनी या प्रकरणी अहमदाबादमध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
गौतम अदानी यांचं अपहरण झालं, यानंतर ३ दिवसांनी त्यांना सोडून देण्यात आलं, ते घरी पोहोचले. पण अपहरणकर्त्यांना त्यांनी याबदल्यात पैसे दिले की दिले नाहीत, याविषयी पुढील अनेक दिवस चर्चा होत राहिली, पण शेवटपर्यंत हे एक कोडंच राहिलं.
यात दुसऱ्याबाजूला चर्चा अशी होती की, अपहरणकर्त्यांना ५ कोटी रुपयांची खंडणी देण्यात आली होती. दुबईतील इरफान गोगा याला हे पैसे देण्यात आले, बबलू श्रीवास्तव गँगचा इरफान गोगा हा एक भाग होता.बबलू श्रीवास्तव एका प्रकरणात पोलिसांच्या हाती आला तेव्हा त्याने ही कबुली दिली होती.
अपहरणानंतर गौतम अदानी यांना एका फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं होतं, आणि ते खूप घाबरलेले होते. गौतम अदानी एवढे घाबरलेले होते की, या केसमध्ये नंतर आरोपींना जेव्हा अटक झाली, तेव्हा त्यांच्या ओळख परेडसाठी देखील ते तिथे आले नव्हते.पुराव्यांअभावी या आरोपींना नंतर कोर्टाने सोडून दिलं होतं.