पती-पत्नीमध्ये वाद झाला, वडिलधारी माणसं वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होती, पण…

पती-पत्नीमध्ये वाद झाला. मग पती संतापला अन् मोठा अनर्थ घडला. ती जीवाच्या आकांताने पळत होती, पण त्याच्यापुढे तिचा निभाव लागला नाही.

पती-पत्नीमध्ये वाद झाला, वडिलधारी माणसं वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होती, पण...
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: TV9
| Updated on: May 13, 2023 | 6:48 PM

हैदराबाद : हल्ली छोट्या छोट्या वादातून घटस्फोट, हत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. वनस्थलीपुरम पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपी पती हैदराबाद पोलीस दलात हवालदार आहे. आईची हत्या करत असताना 15 वर्षाच्या मुलाने रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला. यात मुलगा जखमी झाला आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. के. राजकुमार असे आरोपी हवालदाराचे नाव आहे.

पती-पत्नीमध्ये वाद झाला, मग पतीने पत्नीवर हल्ला केला

दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये काही कारणातून वाद झाला होता. यावरुन घरातील वडिलधारी मंडळी दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न करत होती. शुक्रवारी या जोडप्यामध्ये काही कारणावरून पुन्हा जोरदार वाद झाला, त्यामुळे संतापलेल्या राजकुमारने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पत्नी जीवाच्या आकांताने पळत होती. मात्र पतीने पत्नीचा पाठलाग करून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.

आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलावरही हल्ला

आईवर हल्ला होताना पाहून राजकुमारचा 15 वर्षाचा मुलगा वडिलांना रोखण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आरोपीने त्याच्यावरही हल्ला करुन त्याला जखमी केले. मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर पती फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.