धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद झाला, मग झटापटीत तिसऱ्या मजल्यावरुन महिला थेट…

| Updated on: Mar 31, 2023 | 5:42 PM

नागपुरात रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे महिला आपल्या कुटुंबीयांसोबत मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि इथेच घात झाला.

धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद झाला, मग झटापटीत तिसऱ्या मजल्यावरुन महिला थेट...
नागपुरमध्ये धक्काबुक्कीतून महिला तिसऱ्या मजल्यावरुन पडली
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर / सुनील ढगे : बसण्याच्या कारणावरुन झालेल्या झटापटीत तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नागपुरातील फॉर्च्युन मॉलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी पीडित महिला आपल्या बहिणीसोबत फॉर्च्युन मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर गेली होती. तेथे एका जोडप्यासोबत झालेल्या वादादरम्यान ही घटना घडली. संतोषी बिनकर असे महिलेचे नाव असून, ती पेशाने परिचारिका होती.

रामनवमीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले होते

पोद्दरेश्वर राम मंदिरतर्फे दरवर्षी रामनवमीनिमित्त सार्वजनिक शोभायात्रेचे आयोजन केले जाते. ही शोभायात्रा शहराच्या वेगवेगळ्या भागातून जाते. ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. रस्त्यावर उभे रहायला जागा नसल्याने लोक पर्यायी जागा पाहतात. पीडित महिलाही ही शोभायात्रा पाहण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत आली होती. मात्र रस्त्यावर प्रचंड गर्दी असल्याने महिला आणि तिची बहिण समोर असलेल्या फॉर्च्युन मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या.

भांडण सोडवायला मध्ये पडली अन् जीवानिशी गेली

मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर गरोदर महिला आणि तिचा पती आधीच बसले होते. यावेळी धक्का लागल्याच्या कारणातून गरोदर महिलेच्या पतीचा पीडित महिलेच्या बहिणीशी वाद झाला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी सदर महिला मध्ये पडली असता सदर इसमाने तिला धक्का दिल्यानं ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली.

हे सुद्धा वाचा

जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर गरोदर महिला आणि तिचा पती तेथून निघून गेले. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंतोली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे रामनवमीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.