Solapur IT Raid : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आयकर विभागाच्या धाडी; हॉस्पिटल्स, डॉक्टरसह कारखाने आणि उद्योगांची तपासणी सुरू

| Updated on: Aug 25, 2022 | 6:32 PM

अद्याप आयकर विभागाच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सकाळी 7 वाजल्यापासून शहरात जवळपास 7 ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती समोर येतेय.

Solapur IT Raid : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आयकर विभागाच्या धाडी; हॉस्पिटल्स, डॉक्टरसह कारखाने आणि उद्योगांची तपासणी सुरू
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आयकर विभागाच्या धाडी
Image Credit source: TV9
Follow us on

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून आयकर विभागा (Income Tax)चे धाडसत्र सुरु आहे. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्या वतीने चौकशी (Inquiry) सुरु आहे. तर पंढरपूर येथील खासगी साखर कारखान्याचे चालक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखाने आणि उद्योगावर या धाडी (Raids) टाकण्यात आल्यात. याबाबत अद्याप आयकर विभागाच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सकाळी 7 वाजल्यापासून शहरात जवळपास 7 ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती समोर येतेय.

सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्सट्रक्शन या ठिकाणी सकाळपासून झडती सुरु आहे. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहुल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल आणि कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरीही धाड

सोलापुरातील आयकर विभागाचे वरीष्ठ अधिकारी बिपीनभाई पटेल यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. सकाळपासून पटेल यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयांची चौकशी सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र यासंदर्भात आयकर विभाग किंवा पटेल यांच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

कोरोना काळात प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयांमध्ये आयकर विभागाच्या धाडी

सोलापुरातील दोन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञांच्या रुग्णालयात देखील आज सकाळी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झालेत. सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक याठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ अनुपम शहा यांच्या हॉस्पिटलवर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. सकाळपासून आयकर विभागाचे पथक या ठिकाणी तपासणी करत आहेत.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी अभ्यास शिबीराचे फलक लावून टाकली धाड

आज महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबीराचे पोस्टर लावण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार जवळपास 24 पथकांद्वारे विविध ठिकाणी कारवाया सुरु आहेत. यामध्ये 50 गाड्या आणि शंभरहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

सोलापूरमध्ये ‘या’ ठिकाणी आयकर विभागातर्फे तपासणी

1. मेहुल कन्स्ट्रक्शन
2. अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर
3. अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी
4. बिपीन पटेल यांच्या घरी
5. डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल
6. डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक
7. डॉ. विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (Income Tax Department raids hospitals, doctors, factories and industries in Solapur)