गाडीतील पैशांची बॅग लंपास करायचा, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सिग्ननवर किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या हेरायचे आणि डिक्की फोडून पैशांची बॅग लंपास केल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. अखेर पोलिसांनी या चोरट्यांविरोधात कंबर कसली आहे.

गाडीतील पैशांची बॅग लंपास करायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
गाडीतून पैशाची बॅग चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Image Credit source: TV9
| Updated on: May 05, 2023 | 8:26 PM

शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : गाडीत ठेवलेल्या पैशाच्या बॅगा लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून 6 गुन्हे उघडकीस आणत सहा लाखांच्या रोख रक्कमेसह दुचाकी असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मधू जाला असे अटक केलेल्या 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो आंध्रप्रदेश राज्यातील कपरालतीप्पा येथील राहणारा आहे. पोलीस आरोपीच्या साथीदाराचाही शोध घेत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपीला पकडले

सांगली जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपासून चारचाकी गाडीमध्ये आणि दुचाकी गाडीमध्ये ठेवण्यात आलेले पैशाचे बॅग लंपास करण्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना कुपवाडच्या हनुमाननगर येथील एका भाड्याच्या खोलीमध्ये एक संशयित तरुण राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर छापा टाकून मधु जाला याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

चौकशीत सहा गुन्ह्यांची उकल

चौकशीत आरोपीने सहा गुन्ह्यांची उकल केली. आरोपीने त्याच्या साथीदारांनी सांगलीच्या विश्रामबाग, आष्टा, कवठेमहंकाळ यासह कोल्हापूर आणि इचलकरंजी या ठिकाणी चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून आणि दुचाकीच्या डिक्कीतून कुलूप तोडून पैशांचा बॅगा लंपास केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केलेत याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.