जळगावातील ‘त्या’ मुलाचा नरबळीच? लवकरच खुलासा होणार, चौकशीसाठी SIT स्थापन

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 16 जून रोजी 14 वर्षीय विद्यार्थ्यांचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता या घटनेचा तपास एसआयटी करणार आहे.

जळगावातील त्या मुलाचा नरबळीच? लवकरच खुलासा होणार, चौकशीसाठी SIT स्थापन
| Updated on: Jun 29, 2025 | 10:51 PM

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 16 जून रोजी 14 वर्षीय विद्यार्थ्यांचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. तेजस महाजन असे मयत मुलाचे नाव आहे. सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या तेजस याचा मृतदेह हत्या करून गावाजवळ झाडा झडूपांमध्ये फेकून दिल्याचे समोर आले होते. त्याचा कंठ काढण्यात आला होता, त्यामुळे नरबळीतून हत्या झाल्याचा संशय कुटूंबीयांनी व्यक्त केल्याने या घटनेने जळगाव जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

मयत तेजस महाजन याचे वडील यांचे गावात हार्डवेयरचे दुकान असून ते शेती करतात. वडील बाहेरगावी असल्याने तेजस महाजन हा दुकान बंद करून बाजारात फिरत असताना बेपत्ता झाला.त्यानंतर कुटूंबीयांनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेजस चा मृतदेह गावाजवळील झाडाझुडपांमध्ये आढळून आला होता.

गावात फिरताना मुलाचा धक्का लागल्याने याचा राग आल्याने रागातून तिघांनी मुलाला मारहाण केली होती, यात एकाने मुलावर चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सुरेश खरते, हरदास वास्कले अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी रिचडीया कटोले हा फरार असून त्याच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. मारहाणीत रिचडीया कटोले याने मुलाच्या गळ्यावर चाकूने वार केला, यात त्याचा मृत्यू झाला अशी कबुली अटकेतील दोन्ही आरोपींनी दिली आहे. मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी मुलाचा मृतदेह गावाबाहेर असलेल्या झाडा- झुडपामध्ये फेकून दिला होता असे तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ दोन संशयितांना अटक केली होती, बाजारात फिरताना तेजस याचा धक्का लागल्याच्या काठावरून आरोपींनी त्याला मारहाण करून त्याची हत्या केला संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एक आरोपी फरार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली होती.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी नरबळीचे कलम लावले नाही हे कलम लावण्यासाठी आणि या घटनेचा सीबीआयच्या माध्यमातून तपास करावा या मागणीसाठी रिंगणगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये ग्रामस्थ सहभागी झाले. आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

आंदोलनानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे तसेच या प्रकरणात तपास करण्याच्या माध्यमातून पोलिसांनी एस आय टी स्थापन केली आहे. एसआयटी पथकामध्ये सात अधिकारी,कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या माध्यमातून आता मुलाच्या हत्येच्या घटनेचा तपास केला जात आहे. त्यामुळे आता आगामी काळात या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता आहे.