
फुलपूरहून एका मुलीला केरळला धर्मांतरासाठी नेल्याच्या आणि जिहादी प्रशिक्षण घेण्यासाठी दबाव आणल्याच्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान पीडितेने अनेक खुलासे करत खूप महत्वाची माहिती दिली. ट्रेनने केरळला पोहोचल्यानंतर, दरकशा नावाच्या मुलीने रेल्वे स्टेशनवरून कोणालातरी फोन केला होता. त्यानंतर तिथे एक गाडी आली आणि मला त्रिशूरमधील एका वसतिगृहात नेण्यात आले, असे पीडितेने सांगितलं.
मुलीने केले महत्वाचे खुलासे
पोलिसांच्या तौकशीत त्या तरूणीने अनेक खुलासे केले. तिथे जेवण झाल्यानंतर मला आराम करण्यास पाठवण्यात आलं. नंतर पुढच्या दिवसापासून मला तालीम देण्यास सुरूवात झाली. हिजाब कसा घालायचा ते शिकवण्यात आलं आणि काही दिवसानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. एवढंच नव्हे तर जिहादी प्रशिक्षण घेण्यासाठी माझ्या वर दबाव टाकण्यात आला, असा अनुभव तिने सांगितला.
मात्र या सगळ्या गोष्टींमुळे ती तरूणी खूपच घाबरली आणि संधी मिळताच ती तेथून कशीबशी निसटली, पळाली. ती रेल्वे स्टेशनला पोहोचते ना पोहचते तोच दरकशा तिथे आली आणि त्यांचं भांडण झालं. अखेर टीसीने तिला पकडलं आणि पोलिसांकडे सोपवलं.
दरकशाच्या फोनमधून काय सापडलं ?
प्रयागराजहून दिल्लीला पोहोचेपर्यंत दरकशा ही मुलगी ताजशी वारंवार फोनवर बोलत होती. आता कुठे पोहोचतोयं हे ती वारंवार सांगत राहिली. अखेर अटकेनंतर दरकशाच्या फोनची तपासणी करण्यात आली. तेव्हा 8 ते 9 मे दरम्यान, प्रयागराजहून दिल्लीला जात असताना, ती आणि ताज हे दोघंही सुमारे 13 वेळा फोनवर बोलले, असे उघड झाले.
तुरुंगात पाठवण्यापूर्वी चौकशीदरम्यान, आरोपी दरकशाने महत्वाची माहिती दिली. तिने सांगितलं की ताज हा फुलपूरमधील जोगिया शेखपूरचा रहिवासी आहे. तो तिच्या बहिणीचा मेहुणा आहे आणि अनेक वर्षांपासून केरळमध्ये काम करत आहे. ताजच्या आग्रहावरूनच ती त्या तरूणीला केरळला घेऊन गेली होती. ताज म्हणाला होता की, कामासाठी मुलींची गरज आहे आणि त्यासाठी तिला चांगले कमिशन मिळेल, असं तिने सांगितलं.
काय आहे प्रकरण ?
पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 8 मे रोजी तिच्या गावातील दरकशा बानो नावाच्या महिलेने मुलीला पैशाचे आमिष दाखवून पळवून नेले. दरकशाआणि मोहम्मद कैफ नावाच्या तरुणाने प्रथम मुलीला प्रयागराज जंक्शनवर नेले, जिथे वाटेत तिचा विनयभंग झाला. त्यानंतर, दरकशा ही मुलीला दिल्ली आणि नंतर केरळमधील त्रिशूर येथे घेऊन गेली. येथून तिला जिहादी बनवण्याचा कट रचला गेला.
केरळमध्ये पोहोचल्यानंतर, अल्पवयीन मुलीची काही अज्ञात आणि संशयास्पद लोकांशी ओळख करून देण्यात आली. त्यांनी प्रथम मुलीला पैशाचे आमिष दाखवले आणि नंतर जबरदस्तीने तिचे धर्मांतर केले. अखेर तिच्यावर जिहादी प्रशिक्षणासाठी दबाव आणण्यात आला. घाबरलेली मुलगी कशीबशी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने त्रिशूर रेल्वे स्टेशन गाठले आणि फोनवर तिच्या आईला तिच्यावरील अत्याचाराबद्दल सांगितले.