मोठी बातमी! केतन अग्रवाल प्रकरणात थेट राज्य सरकारची एन्ट्री, विधानसभेत मोठी घोषणा

Lohagad Fort Case : केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणात थेट राज्य सरकारने एन्ट्री केली आहे. या प्रकरणाबाबत थेट विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! केतन अग्रवाल प्रकरणात थेट राज्य सरकारची एन्ट्री, विधानसभेत मोठी घोषणा
Ketan Agarwal Lohgad Case
Image Credit source: Google
| Updated on: Jun 25, 2026 | 10:09 PM

पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवालच्या मृत्यूचे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. सुरुवातीला ही घटना ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात मानली जात होती. मात्र आता केतनची होणारी बायको आणि तिच्या प्रियकराने त्याचा कट रचून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता या प्रकरणात थेट राज्य सरकारने एन्ट्री केली आहे. या प्रकरणाबाबत थेट विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केतन अग्रवाल प्रकरणाचा तपास आता एसआयटीमार्फत होणार

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी ही घोषणा केली आहे. या प्रकरणाबाबत आमदार सुनील शेळके यांनी कारवाईची मागणी केली होती, त्यानंतर ही एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे. मात्र आता राजू खरे यांनी दिलेले निर्देश वादात सापडण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. डोंगरावरून पाय घसरून पडल्याने अपघाती मृत्यूची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र संशयानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून या घटनेचा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नोव्हेंबरमध्ये होणार होते केतन आणि सियाचे लग्न

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठीच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. लग्नापूर्वी या दोघांचे बाली येथे प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचीही योजना होतीस मात्र केतनचा पासपोर्ट हरवल्याने फोटोशूट रद्द करण्यात आले होते. तसेच या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते अशी माहितीही समोर आली आहे. अशातच आता या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत होणार आहे, त्यामुळे यातून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us