घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला चिमुकला, तब्बल एक महिन्यानंतर अपहृत मुलाची सुखरुप सुटका

| Updated on: Jan 27, 2023 | 7:43 PM

भिवंडी शहरातील कामतघर परिसरातून 26 डिसेंबर 2022 रोजी आई घरात कपडे धुवत होती. यावेळी मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. विक्रीच्या उद्देशाने चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते.

घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला चिमुकला, तब्बल एक महिन्यानंतर अपहृत मुलाची सुखरुप सुटका
अपहरण झालेल्या चिमुकल्याची पोलिसांकडून सुटका
Image Credit source: TV9
Follow us on

भिवंडी : घराबाहेर खेळता खेळता अपहरण झालेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याची सुटका करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गणेश नरसय्या मेमुल्ला, भारती सुशील शाहु आणि आशा संतोष शाहु अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 26 डिसेंबर 2022 रोजी दीड वर्षाच्या मुलाचे घराबाहेर खेळत असताना अपहरण झाले होते. एक महिना कसून शोध घेत पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेत बालकाची सुखरुप सुटका केली आहे.

भिवंडी शहरातील कामतघर परिसरातून 26 डिसेंबर 2022 रोजी आई घरात कपडे धुवत होती. यावेळी मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. विक्रीच्या उद्देशाने चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते.

भारती सुशील शाहु आणि आशा संतोष शाहु या दोघी बहिणी असून, आशा हिस मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला. तो तिने बहीण भारतीस बोलून दाखवला. भारतीने ओळखीच्या गणेश नरसय्या मेमुल्ला याच्यासोबत त्यांनी हा कट रचून मूल चोरी करुन विक्री करण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

यानंतर गणेश मेमुल्ला याने हनुमान नगर परिसरात टेहळणी करून लहान मुलाला हेरले. यावेळी सदर चिमुकला हा त्याच्या नजरेत आला आणि त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुलगा अचानक गायब झाल्याने आई-वडिलांनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र मुलगा कुठेही सापडला नाही. यानंतर आई-वडिलांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.

शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनी महिनाभर या मुलाच्या शोधासाठी अथक प्रयत्न केले होते. पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत तब्बल एक महिन्याने मुलाची सुखरूप सुटका करून आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या कामगिरीबद्दल भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाचा पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देत सन्मान केला.