Kolhapur crime : माथेफिरूकडून वृद्धाची डोक्यात दांडकं मारून हत्या

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका माथेफिरूने वृद्ध नागरिकाच्या डोक्यात दांडक मारून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Kolhapur crime : माथेफिरूकडून वृद्धाची डोक्यात दांडकं मारून हत्या
| Updated on: Feb 12, 2024 | 8:51 AM

कोल्हापूर | 12 फेब्रुवारी 2024 : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गेल्या १५ दिवसांत कुठे ना कुठे गोळीबाराच्या घटना घडतच आहेत. महिन्याभरापूर्वी पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या झाली. या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच आता करवीर नगरी अर्थात कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका माथेफिरूने वृद्ध नागरिकाच्या डोक्यात दांडक मारून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कुडित्रे गावातील ही दुर्दैवी घटना आहे. हत्येचा हा संपूर्ण थरार तेथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या हल्ल्यात जंभा साठे या वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर रतन भास्कर अस माथेफिरू हल्लेखोरांच नावं असून हत्येनंतर तो तातडीने फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जंभा साठे हे कुडित्रे गावातील एका चौकात त्यांच्या मित्रासोबत बोलत थांबले होते. तेवढ्या, माथेफिरू, आरोपी रतन हा तिथे आला आणि त्याने एका दांडक्याने साठे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाख करण्यात आले, मात्र तेथे दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी रतन भास्कर हा फरार झाला. घटनेची माहिती मिळताच करवीरपोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. अखेर अथक शोधानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या. त्याने ही हत्या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही, तपासानंतर हत्येचं कारण समजू शकेल.