
लोणावळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने स्वत:ला 250 फूट खोल दरीत झोकून दिलं. या घटनेने सर्वच हादरले आहे. तब्बल पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर या अभियंत्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पत्नीच्या वाढदिवशीच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कामाच्या ठिकाणी काही लोकांकडून त्रास दिला जात असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पत्नीचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना लोणावळा येथे घडली आहे. वीरेंद्र सिन्हा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते सध्या हिंजवडी येथे नोकरी करत होते. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत होती. पण या घटनेने नवं वळण घेतलं आहे. ऑफिसमधील काही लोकांकडून होणाऱ्या त्रासातून त्याने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नेमकं काय झालं याचा तपास पोलीस करत असून अधिक माहिती समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 12 फेब्रुवारी रोजी पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीपासून त्यांनी पत्नीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंबर ब्लॉक असल्याने संभाषण होऊ शकले नाही. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून आयुष्य संपवतअसल्याची माहिती दिली आणि त्यानंतर टायगर पॉईंट येथून सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत उडी घेतली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. वीरेंद्र सिन्हा हे हिंजवडीत कंटेनर सेल विभागात कार्य करत होते.
काय घडलं नेमकं?
वीरेंद्र सिन्हा हे पुण्यात पत्नीसोबत राहत होते. पत्नीच्या वाढदिवशीच ते घरा बाहेर पडले. त्यानंतर संध्याकाळपासून त्यांनी पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. त्यांनी रात्रीपर्यंत प्रयत्न केले. पण संपर्कच झाला नाही. त्यानंतर पहाटे लायन्स पॉइंट येथे त्यांची चारचाकी गाडी संशयास्पदरित्या आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि वीरेंद्र यांनी टायगर पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. ज्या ठिकाणी वीरेंद्र यांची कार उभी होती, त्यासमोरी 250 फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने शोधाशोध घेऊन त्यांचा मृतदेह शोधून काढला.
पत्नीला मेसेज, व्हिडीओ
दरम्यान, मृत्यूपूर्वी वीरेंद्र यांनी त्यांच्या पत्नीला मेसेज आणि व्हिडीओ केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या व्हिडीओत त्यांनी नेमकं काय म्हटलं? आणि काय मेसेज आहे? याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच वीरेंद्र यांनी मृत्यूपूर्वी मित्रांनाही ई-मेल आणि मेसेजद्वारे काही टोकाचे संकेत दिले होते, अशी माहिती समोर आली असून पोलीस त्याचाही छडा लावत आहेत.