
एका युवतीने, मुस्लिम युवकावर प्रेम जाळ्यात ओढून धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही युवती 20 वर्षांची आहे. युवतीच्या म्हणण्यानुसार, युवकाने तिला हनुमान चालीसा आणि शिव स्त्रोत वाचून तिचा विश्वास जिंकला. नंतर धमक्या देऊन तिला इस्लाम कबूल करण्यासाठी दबाव आणला. या प्रकरणी चिनहट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हे प्रकरण आहे.
युवतीचा आरोप आहे की, गावात राहणारा मुस्लिम युवक राशिदने तिच्याशी मैत्री केली. सुरुवातीला त्याने तो हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्म मानतो असं तिला सांगितलं. युवतीचा विश्वास संपादन करण्यासाठी तो हनुमान चालीसा आणि शिवस्त्रोत वाचायचा. “त्याच्या वर्तनावरुन मला असं वाटलं की, तो माझ्यावर खरं प्रेम करतो. माझ्यासमोर तो हिंदू धार्मिक भजन आणि चालीसाच पठन करायचा. त्यामुळे माझा त्याच्यावरचा विश्वास वाढला” असं युवतीने सांगितलं.
तेव्हा खरे रंग दाखवले
युवतीनुसार, काही काळाने राशिदने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. युवतीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. युवतीने त्याला विरोध केला, त्यावेळी त्याने पैसे आणि परदेशात चांगलं आयुष्य मिळेल असं स्वप्न दाखवलं. राशिदने तिला सांगितलं की, सौदी अरेबिया आणि बांग्लादेशात त्याचे नातेवाईक राहतात. जर, मी इस्लाम स्वीकारला, तर आपण तिथे जाऊ. सर्व काही ठिक होईल असं राशिदने युवतीला सांगितलं.
पुष्पगुच्छ फेकून धमकावण्याचा प्रयत्न
युवतीने धर्म परिवर्तनाला नकार दिल्यानंतर राशिदने तिला तिचे एडिटेड फोटो व्हायरल करण्याची आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. राशिदने रस्त्यात युवतीला अडवून तिचा व्हिडिओ बनवला. एकदा फुलाचा पुष्पगुच्छ फेकून धमकावण्याचा प्रयत्न केला. भितीपोटी अनेकदा युवतीच्या मनात आत्महत्येचे विचार आले.
नातेवाईकांचा बांग्लादेश आणि सौदी अरेबियाशी संबंध
दीर्घकाळ भिती आणि मानसिक दबावामुळे युवतीने अखेर हिम्मत एकवटून आपल्या आईला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी चिनहट पोलीस ठाण्यात राशिद विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय. पोलीस सूत्रानुसार राशिदच्या काही नातेवाईकांचा बांग्लादेश आणि सौदी अरेबियाशी संबंध असल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. चिनहट पोलिसांनी सांगितलं की, आरोपीविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.