
पत्नीचं दुसऱ्या पुरूषाशी अफेअर असल्याच्या संशयावरून तिची क्रूर हत्या करणाऱ्या पतीला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 साली दिनेश परशुराम मोरे या आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय दिनेशला होता. त्यामुळेच त्याने तिचा जीव घेतला. 5 वर्षांपूर्वी हे हत्याकांड मुंबईतील मालाडमधील कुरार येथे घडलं होतं.
त्यानंतर दिनेश मोरे हा पत्नीच्या हत्या प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय 2020 मध्येच न्यायालयाने दिला होता. कलम 302 च्या अतंर्गत त्याला दोषी ठरवण्यात आलं. परिस्थितीजन्य पुरावे आणि इतर पुराव्यांच्या आधारे दिनेशला दोषी ठरवण्यात आलं होतं. अखेर या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिनेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात न्यायालयाने निरीक्षणही नोंदवलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी १० फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर निकाल दिला. मात्र बुधवारी त्याची प्रत उपलब्ध झाली. दिनेशने केलेलं कृत्य हे दुर्मिळातलं दुर्मीळ नाही. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असं न्यायलयाने नमूद केलं होतं. त्याने हत्या केली आहे त्यामुळे न्यायालय दीनेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला.
नेमकं काय घडलं होतं ?
मृत महिला, दिनेशची पत्नी ही काही घरांमध्ये गृहसेविकेचे काम करत होती. मात्र तिचे परपुरुषाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय दिनेशला होता. यावरुन त्याने त्याच्या पत्नीला जाब विचारला, त्याच मुद्यावरून त्या दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. त्याच संशयातून, संतापाच्या भरात 27 फेब्रुवारी 2020 साली दिनेशने पत्नीची हत्या केली. संबंधीचे पुरावे सादर केल्यानंतर दिनेश मोरेला न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.