
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात 25 हून अधिक कुत्र्यांना गोळ्या घालून ठार मारल्याची भयानक घटना समोर आली आहे. एका गावात एक बदमाश बंदूक घेऊन फिरतोय आणि त्याला जिथे कुत्रा दिसतो तिथे तो त्याला त्याक्षणीच गोळी मारतो. या घटनांशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र कुत्र्यांच्या या हत्येमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून या सनकी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
ही संपूर्ण घटना झुंझुनू जिल्ह्यातील नवलगढ पोलीस स्टेशन परिसरातील कुमावास गावातील आहे. तिथे एक बदमाश माणूस गावातील भटक्या कुत्र्यांना शोधतो , एवढंच नव्हे तर कुत्रा दिसताच तो त्याच्या डबल-बॅरल बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्याही करतो. त्याने आतापर्यंत 25 हून अधिक कुत्र्यांना मारले आहे. ही घटना 2 ते 3 ऑगस्ट दरम्यानची आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दुहेरी बंदूक असलेला एक व्यक्ती दुचाकीवरून कुत्र्यांचा पाठलाग करताना आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे.
गोळी मारून श्वानांना संपवतो
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. हमीरी गावाच्या माजी सरपंच सरोज झझारिया यांनी कुत्र्यांना मारल्याबद्दल पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीत झझारिया यांनी असा दावा केला की, आरोपी शेओचंदने गेल्या काही दिवसांत 25 हून अधिक कुत्र्यांना मारले आहे. घटनेची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डुमरा येथील रहिवासी शेओचंद बावरिया नावाच्या व्यक्तीने कुत्र्यांना गोळ्या घातल्या होत्या.
पोलिसांकडून तपास सुरू
या बयानक घटनेनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे परिसरातील कुत्र्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच प्राणीप्रेमींमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत त्या निर्घृण आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे.