सरकारी वकील vs पालांडेंचे वकील, दोघांचा परस्पर विरोधात्मक युक्तीवाद, अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?

| Updated on: Jul 01, 2021 | 5:39 PM

ईडीच्या वकिलांनी पालांडे आणि कुंदन यांच्यावर गंभीर आरोप केलाय. तर दुसरीकडे पालांडे यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत वेगळी भूमिका मांडली (money laundering case).

सरकारी वकील vs पालांडेंचे वकील, दोघांचा परस्पर विरोधात्मक युक्तीवाद, अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत आता 6 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांना 25 जूनला ईडीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा अटक केली होती. कोर्टाने त्यांना 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी रोखठोक भूमिका मांडत युक्तीवाद केला. ईडीच्या वकिलांनी पालांडे आणि कुंदन यांच्यावर गंभीर आरोप केलाय. तर दुसरीकडे पालांडे यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत वेगळी भूमिका मांडली (money laundering case).

ईडीचे वकील सुनील गोंसालविस यांचा युक्तीवाद काय?

“आरोपी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे तपासात सहकार्य करत नाहीत. सचिन वाझे यांनी पालांडे यांना लाखो रुपये गुड लक मनी दिला आहे. तसं वाझे यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे. मात्र, आता हे दोघे आपण सचिन वाझे यांना ओळखतच नाही, असं सांगत आहेत. हे दोघे मिनिस्टरच्या जवळ होते. 4 मार्च रोजी बैठक झाली. यावेळी व्यवहाराचं सर्व ठरलं होतं. त्याबाबतची माहिती तपासात उघड झाली आहे. मात्र,आता आपण कोणाला ओळखत नसल्याचं यांचं म्हणणं आहे”, असं ईडीचे वकील म्हणाले (money laundering case).

वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची लिस्टही आम्हाला सापडली आहे. याच्यातही यांचा रोल आहे. हा घोटाळा 100 कोटी रुपयांचा नाही तर त्याहूनही अधिक कोटींचा असावा. बार मालक यांच्याकडून पैसे यायचे. मात्र ते कुठे जायचे याचा शोध लागत नाहीय. या आरोपींकडे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या आहेत. त्या अनुषंगानेही आम्हाला तपास करायचा आहे, असं ईडीचे वकील सुनील गोंसालविस यांनी कोर्टाला सांगितलं.

संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांचा युक्तिवाद काय?

“संजीव पालांडे यांची सीबीआयने 22 मे रोजी अनेक तास चौकशी केली. त्यांनी सर्व सहकार्य केलं. त्यानंतर त्यांनी बोलावलं नाही. ही केस म्हणजे पॉलिटिकल आहे. दोन पक्षांच्या भांडणात हे प्रकरण घडलं आहे. हे अॅडिशनल कलेक्टर दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन करत असतं”, असं वकील शेखर जगताप म्हणाले.

“एक साधा API सचिन वाझे आरोप करतोय. एका बार मालकाने सचिन वाझे याला पैसे दिल्याचा जबाब दिला आहे. या आधारावर सचिन वाझे याची चौकशी केली. जबाब नोंदवला. त्यानंतर पालांडे यांच्यावर कारवाई झाली आहे. बार मालक हे सचिन वाझे यांना पैसे द्यायचे, असं त्यांनी जबाब दिला आहे. बार मालक पैसे द्यायचे त्यांना सांगीतल जायचं. हे पैसे नंबर 1 याला द्यायचे आहे. सचिन वाझे हे पोलीस दलात होते. त्यांचे प्रमुख नंबर 1 म्हणजे पोलीस आयुक्त होते. पण ईडी त्यांच्याबाबत काहीच बोलत नाही”, असं पालांडे यांचे वकील म्हणाले.

“पैसे कोणाचे आहेत तर सचिन वाझे याचे आहेत. त्याने गोळा केलेत. 4 मार्च रोजी 2021 रोजी मीटिंग झाली होती. याबाबत संजीव पालांडे मान्य करत आहेत, असं रिमांडमध्ये म्हटलं आहे. हे शक्यच नाही. 1 मार्च ते 10 मार्च 2021 दरम्यान अधिवेशन सुरू होतं. DCP राजू भुजबळ, SS ब्रांच यांना DG कार्यालयाने अधिवेशनासाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमलं होतं”, असा दावा पालांडेंच्या वकिलांनी केला.

“सचिन वाझे याने 4 मार्चला अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या, असं रेकॉर्ड आहे आणि त्याच दिवशी मनसुख हिरेन गायब झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता. ईडी म्हणतेय त्यांच्याकडे आयपीएस अधिकाऱ्यांची लिस्ट आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या होत असतात. त्याची यादी DG ऑफिसमध्ये असते. त्यात वेगळं असं काही नाही. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्री कार्यालय करत असतं. संजीव पालांडे यांचा काही संबंध नाही. आरोपींना पुन्हा ईडी कोठडी देण्याची गरज नाही. यांचा काही संबंध नाही. केवळ मंत्र्यांचे पीए होते म्हणून कारवाई केली आहे”, असा युक्तीवाद शेखर जगताप यांनी केला.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुख यांच्या दोन्ही सचिवांच्या ईडी कोठडीत वाढ, पालांडे, कुंदन आणि वाझे यांची समोरासमोर चौकशी होणार