जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा झटका, ईडीकडून चौकशीचे समन्स

| Updated on: Jul 07, 2021 | 7:25 PM

ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना उद्या म्हणजेच गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे (ED summons to Eknath Khadse on Pune Bhosari Land Scam).

जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा झटका, ईडीकडून चौकशीचे समन्स
एकनाथ खडसे
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ईडीने भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी खडसे यांनाही समन्स पाठवले आहेत. ईडीने पाठवलेल्या नोटीसनुसार खडसे यांना उद्या म्हणजेच गुरुवारी (8 जुलै) सकाळी 11 वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे (ED summons to Eknath Khadse on Pune Bhosari Land Scam).

मोठी कारवाई नाही, पण चौकशीला सामोरं जावं लागणार

विशेष म्हणजे या प्रकरणाची कारवाई थांबवण्यासाठी एकनाथ खडसे हायकोर्टात गेले आहेत. हायकोर्टाने ईडीला सुनावणी सुरु असेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. पण चौकशीबाबत अद्याप कोणतेही आदेश दिलेले नाहीत. कोर्टाचे आदेश असल्याने एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई होणार नाही. मात्र, त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे (ED summons to Eknath Khadse on Pune Bhosari Land Scam).

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?

ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे, “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असं मत अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे खडसेंचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे.

भोसरी जमीन घोटाळा काय आहे?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला