
Kalyan Vishal Gawali Suicide : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तरुंगात असलेल्या विशाल गवळीने आत्महत्या केली आहे. तळोजा येथील तुरुंगात असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. कारण विशाल गवळीच्या वकिलाने मोठा आणि गंभीर स्वरुपाचा दावा केला आहे. विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे, असं त्याच्या वकिलांनी म्हटलंय. तसेच त्याला तळोजा कारागृहात वकिलांना तसेच कुटुबीयांनाही भेटू दिले जात नव्हते, असाही आरोप त्याच्या विकलांनी केला आहे.
विशाल गवळी यांचे वकील अॅड. संजय धनके यांनी गंभीर स्वरुपाचे दावे केले आहेत. “विशाल गवळी यांनी आत्महत्या केलेली नाही. तर त्याला मारलं गेलं आहे. तळोजा कारागृहात वकील आणि कुटुंबीयांना भेटू दिल जात नव्हतं. या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. तीन महिन्यांपासून तो या कारागृहात आहे. तीन ते चार वेळा आम्ही त्याला भेटलो. मी तणावात आहे, असं तो आम्हाला एकदाही बोलला नाही. तपासात मी निर्दोष सुटेल, याचा मला विश्वास आहे, असं त्याने वकिलांना सांगितलं होतं,” असा दावा संजय धनके यांनी केलाय.
न्यायालयानेफाशी आणि जन्मठेप दिली असती तरी चालले असतेय या लोकांना असे काही करण्याचा अधिकार आहे का? पोलिसांना न्यायालयाची भीती राहिलेली नाही, असेही मत वकील धनके यांनी व्यक्त केले.
विशाल गवळी याने तरुंगात आत्महत्या केली असली तरी त्याच्या भावांची दहशत कल्याणच्या परिसरात कायम आहे. ते लोकांना फोन करून धमकावत असल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी केली आहे. विशेष म्हणजे विशाल गवळीचे भाऊ हे तडीपार आहेत. असे असताना तेथील नागरिकांना त्रास दिला जात असून त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तेथील स्थानिकांनी केली आहे. तसेच अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनीही याबाबत तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विशाल गवळी हा सध्या तळोजा कारागृहात होता. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्याने कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याने टॉवेलच्या मदतीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. विशालच्या आत्महत्येची खबर समोर येताच तुरुंगात काही काळासाठी अस्वस्थता पसरली होती. विशाल गवळी हा कल्याण परिसरातील कुप्रसिद्ध गुंड होता. बलात्कार करणे, छेड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्याविरोधात दाखल करण्यात आले होते.