Kamothe : विशालचा नुसता धक्का लागला म्हणून भडकले! कामोठे येथे छोट्याशा वादातून थरारक हत्याकांड

दारु प्यायलानंतर पान खायची इच्छा झाली! आधीच नशेत त्यात स्वतःवरच्या रागावरचा ताबाही गमावून बसले

Kamothe : विशालचा नुसता धक्का लागला म्हणून भडकले! कामोठे येथे छोट्याशा वादातून थरारक हत्याकांड
नवी मुंबईतील थरारक हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 31, 2022 | 10:57 AM

नवी मुंबई : धक्का लागला म्हणून एका 17 वर्षांच्या तरुणाची कामोठे (Kamothe) गावात हत्या (Navi Mumbai Murder) करण्यात आली. या घटनेनं नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव विशाल मौर्या (Vishal Mourya) असं आहे. पाठीत चाकू भोसकून त्याच्या खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी दोघा आरोपांना पोलिसांनी अटक केलीय. सध्या त्यांची कसून चौकशी केली जातेय. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केलं असल्याचं समोर आलंय.

विशाल मौर्या हा 17 वर्षांचा तरुण बेकरीत काम करतो. सूरज बेकरीत काम करणारा विशाल कामोठेमध्येच राहायला होता. काम संपल्यानंतर तो पान शॉपवर जात होता. त्यावेळी ही घटना घडली.

राज वाल्मिकी आणि रवींद्र हरीयाणी हे दोघे जण दारु पिऊन पान शॉपीवर आले होते. पान खाण्यासाठी सलमान पान शॉपवर विशालचा राज आणि रवींद्र यांना धक्का लागला. यातून आधी बाचाबाची झाली. नंतर वाद वाढत गेला आणि हाणामारीला सुरुवात झाली.

विशालला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास आली. त्यानंतर पान शॉप चालक सलमान याने विशालला राज आणि रवींद्रच्या तावडीतून सोडवण्याचाही प्रयत्न केला. पण राज याने जवळ असलेला चाकू काढला आणि विशालच्या पाठीत भोसकला.

विशालवर करण्यात आलेला चाकूचा घाव इतका गंभीर होता, की यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर राज आणि रवींद्र यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालचा जीव वाचावा, यासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यामुळे विशालच्या सहकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेमुळे कामोठेच्या सेक्टर 14 मध्ये खळबळ उडाली आहे. छोटाशा कारणावरुन झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे नवी मुंबईत भीतीचं वातावरण पसरलंय.

22 वर्षीय आरोप रवींद्र राजेश अटवाल उर्फ हरीयाणी आणि 19 वर्षीय राज शैलेश वाल्मिकी या आरोपींना अटक करण्यात आलीय. कामोठे पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. तसंच त्यांच्यावर हत्येचा गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय.