गाडी नंबर 11058… 1660 किमीचा प्रवास, मुंबईत येताच डब्यात सापडले मानवी पाय, प्रचंड खळबळ; 10 दिवसानंतरही…
मुंबईच्या CSMT स्टेशनवर अमृतसरहून आलेल्या ट्रेन 11058 च्या डब्यात मानवी पाय सापडल्याने खळबळ उडाली. 10 दिवसांनंतरही या घटनेचे गूढ कायम आहे. जीआरपी तपास करत असून, डीएनए चाचणी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कल्पना करा… तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. अचानक कोचच्या खाली कापलेला मानवी पाय दिसतो. काय कराल? गेल्या आठवड्यात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हेच घडलं. अमृतसरहून 600 किलोमीटरचा प्रवास करून आलेली एक्सप्रेस मुंबईत थांबली. त्यावेळी रुटीन साफसफाई सुरू असतानाच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. कोचमध्ये मानवी पाय सापडले आणि खळबळ उडाली. आता 10 दिवस झाले तरी ही मर्डर मिस्ट्री अद्याप सुटलेली नाही.
अमृतसर एक्सप्रेसच्या डब्यात सापडलेल्या मानवी पायाचे गूढ अद्याप कायम आहे. अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेसच्या एम-2 डब्यात मानवी पाय आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर जीआरपीने तपास सुरू केला असून हा अवयव कोणाचा आहे, याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे मार्गावरील अपघात किंवा आत्महत्येशी या घटनेचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. डीएनए चाचणीसह विविध तांत्रिक तपासांच्या माध्यमातून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
17 जुलै रोजी सकाळी ट्रेन नंबर 11058 (अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस) यार्डात आली. यार्डात ट्रेनच्या रुटीन सफाईचं काम सुरू होतं. कामगार गप्पा मारत, थट्टामस्करी करत काम करत होते. त्यानंतर पहाटे 6 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अंडरगियर इन्स्पेक्शन सुरू झालं. तेव्हा अचानक मानवी पाय कर्मचाऱ्यांना दिसले. गुडघ्यापासून कापलेला एक पाय दिसला. ट्रेनच्या M2 कोचच्या ट्रॉली आणि व्हील असेंबलीमध्ये हा पाय फसलेला होता. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जीआरपीला खबर दिली. पंचनामा करण्यात आला. कापलेला पाय फॉरेन्सिक तपासणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेला आज 10 दिवस होत आले आहेत. पण हा पाय कुणाचा आहे? तो कोणी आणून ठेवला? या प्रश्नाचं उत्तर अजूनही जीआरपीवाले शोधत आहेत. ट्रेन 15 जुलैच्या सकाळी अमृतसरहून निघाली होती. 17 जुलै रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजता मुंबईला पोहोचली. या प्रवासा दरम्यान कोणतीही धडक झाली नाही. कोणीही ट्रेन खाली आल्याची घटना घडलेली नाही. रेल्वे प्रोटोकॉलनुसार कोणतीही घटना घडली की लगेच कंट्रोल रुमला अलर्ट करावं लागतं. पण तसं काहीच घडलेलं नव्हतं. पोलिसांनी तात्काळ या खुनाची गंभीर दखल घेऊन अमृतसरपासून मुंबईपर्यंतच्या सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना अलर्ट जारी केला आहे. 15 ते 17 जुलैच्या दरम्यान म्हणजे गेल्या दोन आठवड्यात कुठेही रेल्वे अपघात किंवा आत्महत्या करण्यात आली का? याची रिपोर्ट मागवण्यात आली आहे.
चौकशी दरम्यान, एक क्ल्यू मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधून. तिथे नुकतेच दोन रेल्वे अपघात झाले होते. एक प्रकरण पोलिसांनी फेटाळून लावलं आहे. कारण मेलेल्या व्यक्तीचे दोन्ही पाय सुरक्षित आहेत. पण दुसरं प्रकरण अजूनही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. या दुसऱ्या व्यक्तीचं शरीर छिन्नविच्छिन्न झालेलं आहे. त्याची ओळख पटेनासी झालीय. शिवाय त्याचा एक पाय गायब आहे. जीआरपी आता ललितपूरच्या पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लड सँपलची तपासणी केली जात आहे. जर रक्त जुळले तर त्याची खातरजमा करण्यासाठी डीएनए चाचणीही केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते, आम्ही प्रत्येक शक्यतेचा तपास करत आहोत. त्यावर काम करत आहोत. एखाद्या दुर्घटनेत कुणाचा तरी पाय कापला गेला असेल त्यानंतर ट्रेनच्या अंडरकॅरेजमध्ये अडकून तो इतक्या लांब आला असेल.