प्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी

| Updated on: Jun 24, 2021 | 7:43 PM

एक तरुण आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन उत्तर प्रदेशहून कल्याणला आला. पण त्याच दिवशी रात्री तो जखमी अवस्थेत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सापडला (UP youth found on railway track at near Diva railway station).

प्रेम केलं, अल्पवयीन मुलीला पळवून आणलं, पण अखेर करुण अंत, तरुणाची मन हेलावून टाकणारी कहाणी
प्रेमाला कुटुंबियांचा विरोध, अल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईत दाखल, पण तरुणासोबत जे घडलं त्याने अनेकांचं मन हेलावलं
Follow us on

कल्याण (ठाणे) : एक तरुण आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन उत्तर प्रदेशहून कल्याणला आला. पण त्याच दिवशी रात्री तो जखमी अवस्थेत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सापडला. रेल्वे पोलिसांना याबाबत जेव्हा माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तरुणाला शीव रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे त्याची अल्पवयीन प्रेयसी ही गावी पोहोचली आहे. मृतक तरुणाचं नाव साहील हाश्मी असं होतं. या तरुणासोबत नेमकं काय घडलं? त्याने चालत्या गाडीतून उडी मारली आहे की त्याला ढकलून देण्यात आले, याचा तपास डोंबिवली जीआरपी करीत आहे (UP youth found on railway track at near Diva railway station).

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील भदोई येथे राहणारा साहिल हाश्मी हा तरुण त्याच शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीसोबत 18 जूनला मुंबईच्या दिशेला मेल एक्सप्रेसने निघाला. 19 तारखेला ही मेल एक्सप्रेस कल्याणला पोहचली. त्याचदिवशी रात्री 11 वाजेच्या सुमारास सीएसटी लोकलच्या मोटरमनने एका तरुणाला जखमी अवस्थेत रेल्वे ट्रॅकजवळ पडलेले पाहिले. कोपर आणि दिवा स्थानका दरम्यान हा तरुण पडलेला दिसून आला होता. मोटारमॅनने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने या जखमी तरुणाला मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला (UP youth found on railway track at near Diva railway station).

पोलिसांची सविस्तर प्रतिक्रिया

वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश  पवार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. “साहिलचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत जी अल्पवयीन तरुणी येथे आली होती ती तिच्या मूळगावी पोहोचली आहे. जेव्हा साहिल अल्पवयीन तरुणीला घेऊन मुंबईसाठी निघाला तेव्हा त्याबाबतची माहिती त्या मुलीच्या भावाला मिळाली. तो मुंबईत राहतो. दोघं जेव्हा कल्याण रेल्वे स्थानकावर दाखल झाले तेव्हा तरुणीचा भाऊ देखील तिथे पोहचला. त्याने साहिल आणि त्या अल्पवयीन तरुणीला ट्रेनमध्ये पाहिले”, अशी माहिती सतीश पवार यांनी दिली.

“तिच्या भावाचे म्हणणे आहे की, त्याला पाहून साहिल याने कोपर आणि दिव्याच्या दरम्यान चालत्या गाडीतून उडी मारली. आता साहिल सोबत नेमका काय प्रकार घडला? याची सत्यता तपासत आहोत. त्याने उडी मारली की त्याच्यासोबत अनूचित प्रकार घडला आहे, याचा उलगडा लवकर होणार आहे. मात्र आता ती तरुणी आणि तिचा भाऊ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना जी माहिती दिली आहे त्याची आम्ही आमच्या पद्धतीने शहानिशा करणार आहोत. साहिलच्या विरोधात उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल आहे”, अशी देखील माहिती पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.

हेही वाचा : पतीच्या नावे कर्ज काढून त्याचीच सुपारी, बॉयफ्रेण्ड म्हणाला नवरा मेल्यावर कर्जमाफी मिळेल