Mumbai Crime : गर्दीच्या ठिकाणी ठेवायचे पाळत, ‘ती’ विशिष्ट बाईक दिसताच कारनामा करून व्हायचे फरार, अखेर ते चोरटे जेरबंद

29 ऑगस्ट रोजी झालेल्या बाईक चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोघांना अटक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. या चोरांचा कारनामा ऐकून पोलिसही हैराण झाले.

Mumbai Crime : गर्दीच्या ठिकाणी ठेवायचे पाळत, ती विशिष्ट बाईक दिसताच कारनामा करून व्हायचे फरार, अखेर ते चोरटे जेरबंद
| Edited By: | Updated on: Sep 19, 2023 | 11:27 AM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिसांनी बाईक्सची चोरी (bike theft) करणाऱ्या सराईत चोरांना अटक केली आहे. चोरी करणारे हे दोघे मूळचे मालेगाव येथील असून बाईक्सची चोरी करण्यासाठी ते मुद्दाम मुंबईत येत असत. त्यांनी आत्तापर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथून बाईक्स चोरल्या असून चोरीनंतर ते पुन्हा मालेगावच्या दिशेने पसार व्हायचे. अय्याज अली अन्सारी आणि अब्दुल माजीद अन्सारी अशी दोन्ही आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून आत्तापर्यंत आठ बाईक्स ( 8 bikes recovered) जप्त केल्या आहेत. तसेच आत्तापर्यंत १४ गुन्ह्यांची उकल केल्याचेही समोर आले आहे.

कशी करायचे चोरी ?

डीसीपी प्रवीण मुंढे यांनी या चोरांच्या मोडस ऑपरंडीबद्दलही सांगितले. वारंवार गर्दीच्या ठिकाणी जाऊन ते पालत ठेवायचे. अनावधानाने जे बाईकस्वार त्यांच्या गाडीला चावी विसरायचे अशा बाईक्सच्या शोधात हे चोरटे असायचे. अशी एखादी बाईक दिसली रे दिसली की संधी साधून ते ती बाईक चोरायचे आणि फरार व्हायचे. आत्तापर्यंत त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे असंख्य चोऱ्या केल्या आहेत. या दोघांवरही बाईक चोरीचे पूर्वीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेला अय्याज हा आरोपी बाईक चोरी प्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा भोगून तीन महिन्यांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. मात्र शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा वाईट मार्गालाच लागला असून त्याने पुन्हा एकदा बाईक्सवर हात मारायला सुरूवात केली.

दरम्यान 29 ऑगस्ट रोजी झालेल्या एका बाईक चोरीच्या घटनेचा पोलिस तपास करत होते. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना जी तांत्रिक माहिती मिळाली त्या आधारे बाईक चोरणाऱ्या या दुकलीला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.